News Flash

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पडणारच; छत्रपती संभाजी राजे यांचं आश्वासन

परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही, असंही ते म्हणाले.

“दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विधिवत पार पाडला जाईल. तसंच या परंपरेत खंड पडून देणार नाही,” असं आश्वासन छत्रपती संभाजी राजे यांनी दिलं आहे. सध्या राज्यात आणि देशात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडेल किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता छत्रपती संभाजी राजे यांनी या प्रथेत कोणताही खंड पडू देणार नसल्याचं म्हटलं आहे.

“एकच धून ६ जून असं म्हणत महाराष्ट्राच्या अन देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात. गेली १४ वर्षं आपण हा सोहळा अगदी राजवैभवात संपन्न करत आहोत. शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. देशभर किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ५ देशांचे राजदूत त्या त्या देशाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून राजसदरेवर महाराजांना मुजरा करण्यासाठी दाखल झाले होते,” असं छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

“यावर्षी सुद्धा माझ्या मनात अजून मोठं अन आगळं वेगळं नियोजन होतं. परंतु कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. कोरोनामूळे, दरवर्षी प्रमाणे शिवभक्तांना इच्छा असूनही लाखोंच्या संख्येने गडावर येता येणार नाही. संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने ते योग्यही आहे. कोरोनाचा संसर्ग अजून किती प्रमाणात वाढेल? लॉकडाऊनचा कालावधी अजून किती दिवस असेल? किती शिवभक्तांना गडावर जाण्याची परवानगी मिळेल? याबाबत स्पष्टता येत नाही आहे. माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. या महिनाअखेरपर्यंत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

“गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवप्रेमी, इतिहासकार, शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य, अनेक दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य, संबंधित विविध संघटना, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सर्वांशी चर्चा करत आहे. निर्णय घेऊन सर्वांना कळवण्यात येईल. सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरेमध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाययोजना करण्याचा माझा मानस आहे,” असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 7:27 pm

Web Title: chtrapati shivaji maharaj rajyabhishek sohala raigad will take place chtrapati sambhaji raje jud 87
Next Stories
1 पश्चिम बंगालमधील मजूर निघाले पायी; रेल्वे परवानगीसाठी फडणवीसांची ममता बॅनर्जींकडे विनंती
2 “असंगाशी संग केल्यावर काय वेगळं होणार?;” अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
3 “ही जबाबदारी सत्ताधारी पक्षाची; आघाडीतील बेबनावात आम्हाला ओढू नका”
Just Now!
X