राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची गंभीर चर्चा विधानपरिषदेत सुरू असताना विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी उघडकीस आणलेल्या, अहमदनगर जिल्ह्य़ातील चारा घोटाळ्याची माहिती ऐकून सभागृह अवाक् झाले आणि ताबडतोब पतंगराव कदम यांनी सीआयडी चौकशीची घोषणा केली. त्यावर ही सीआयडी चौकशी १५ दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करणार, असे आश्वासन सभागृहाला दिले.
आज नियम २६० अंतर्गत हेमंत टकले यांनी विशेषत: विदर्भ, मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांच्या मुद्दय़ावर विस्तृत माहिती दिली. त्यात पावसाअभावी पिके करणे, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे ओढवलेले संकट, त्यासाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा न होणे, भूगर्भातील पाण्याची पातळी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि चारो डेपो अशा विविध बाबींवर प्रकाश टाकला. त्यानंतर चर्चेसाठी उठलेल्या विनोद तावडे यांनी चारा घोटाळ्याचे झणझणीत उदाहरण देऊन सर्वानाच चकित केले. चारा वाहून नेणारे लोक, त्यांच्या गाडय़ा, तहसीलदार आणि गावचे सरपंच यांच्यातील साटेलोटे या भ्रष्टाचाराला आकार देत असताना सरकारही त्यात सामील असते, असा आरोप त्यांनी केला. सरकारच्या संगनमताने कोटय़वधी रुपयांचा चारा घोटाळा महाराष्ट्रात होत आहे, असे सांगून त्यांनी कर्जत तालुक्यातील बारडगाव येथील उदाहरण दिले.
एमएच१६-१६९०(लुना) या गाडीने २३ टन म्हणजे ५४० किलो चारा वाहून नेला. एमएच१६-२४७१ने(एम८०) १५ टन म्हणजे२४५ किलो चारा तर एमएच१६-५३६५(जेसीबी) या वाहनाने २३ टन चारा वाहून नेला. यात सरपंच नितीन पिसे याला ड्रायव्हर दाखवले आहे. या गाडय़ाचे क्रमांकांची शहानिशा आरटीओ कार्यालयातून केल्यानंतर त्या गाडय़ा म्हणजे लुना, एम.८० आणि जेसीबी असल्याच्या आढळून आल्या. या तिन्ही साधनांमार्फत ७२ दिवसांत ५६१६ टन चारा वाटला कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकरी आणि जनावरांना काहीच नाही मात्र हा पैसा व चारा गेला कुठे? असे एकाच गावात घडले नसून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती असून तहसीलदार, ग्रामपंचायत सदस्य आणि मंत्र्यांच्या आशीर्वादाने अशा प्रकारे घोटाळा केल्याचे तावडे यांनी सांगताच. वनमंत्री पतंगराव कदम यांनी तडकाफडकी सीआयडी चौकशीची घोषणा केली. त्यांच्या जवळच बसलेल्या गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सीआयडी चौकशीला जोडूनच ही चौकशी १५ दिवसांत पूर्ण करून दोषींना पाठिशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही सदनाला दिली.