25 September 2020

News Flash

उरणमध्ये रुग्णांची परवड

नवी मुंबई, पनवेलसह उरण तालुक्यातही करोना रुग्णांत वाढ होत आहे.

पनवेल, नवी मुंबईचा आधार; सिडकोकडून रुग्णालय उभारण्याची मागणी

उरण : दीड लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या उरण तालुक्यात शासकीय रुग्णालय नसल्याने करोनाकाळात सामान्य उरणकरांची मोठी परवड सुरू आहे. त्यांना पनवेल किंवा नवी मुंबईत उपचारांसाठी धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या शासकीय रुग्णालयाची मागणी होत आहे. सिडकोने यासाठी भूखंड दिला असून त्यांनीच रुग्णालयाची उभारणी करावी अशीही उरणकर मागणी करीत आहेत.

नवी मुंबई, पनवेलसह उरण तालुक्यातही करोना रुग्णांत वाढ होत आहे. आतापर्यंत उरणमध्ये करोना संसर्ग झालेले दोन हजार रुग्ण आढळले असून ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. दररोज ३० ते ४० रुग्ण उरणमध्ये सापडत आहेत. करोनाबधितांचा आकडा वाढत असला तरी शहरात लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांवर उपचारांची व्यवस्थाच नाही. दोन करोना काळजी केंद्रे  फक्त लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी असून तेथे दोनशे खाटांची व्यवस्था आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना शेजारील पनवेल किंवा नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात जावे लागत आहे. पनवेलमधील आरोग्य व्यवस्था मुळातच तोकडी आहे. पनवेल पालिकेचेही स्वत:चे रुग्णालय नाही. त्यांनाही उपजिल्हा रुग्णालयाचाच आधार आहे. आणि उरणमधील रुग्णांनाही या ठिकाणीच उपचारांसाठी यावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी परवड सुरू आहे. ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते खासगी रुग्णालयात जात आहेत, मात्र सर्वसामान्य रुग्णांनी जायचे कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. उरण शासकीय रुग्णालय असते तर ही परवड झाली नसती आशी भावना नागरिकांची झाली आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रुग्णालयाची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सिडकोकडून शासकीय रुग्णालयासाठी भूखंड देण्यात आलेला असला तरी ते उभारण्यासाठी लागणारे १०० कोटी रुपये मिळत नसल्याने रुग्णालयाचे काम रखडले आहे. पंधरा वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्याची जबाबदारी सिडकोने घ्यावी अशी मागणी आता प्रकल्पग्रस्त करीत आहेत.

रुग्णालयाच्या प्रस्तावाकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे येथील औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पांकडून त्यांच्या निधीतून हे रुग्णालय उभारण्याचा प्रस्तावही दुर्लक्षित आहे. अनेक प्रकल्पांकडून चालढकल केली जात आहे. सामाजिक सुरक्षा फंड हा स्थानिक नागरिकांच्या सुविधांसाठी वापरण्याची अट असतानी येथील प्रकल्पांनी आपला निधी देशात इतर ठिकाणी तसेच राज्यातही खर्च केला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे.

सिडकोकडून मुंबई रुग्णालय

सिडकोकडून नुकतेच मुलंड येथे एमएमआरडीए क्षेत्रात १८ कोटी रुपये खर्च करून करोना रुग्णालय उभारले आहे. मुंबईत सिडको करोना रुग्णालय उभारते मग आमच्या जमिनी घेतल्या असताना या ठिकाणी सिडको का रुग्णालय उभारणीसाठी पुढे येत नाही असाही प्रश्न प्रकल्पग्रस्त करीत आहेत.

येथील विकासाची जबाबदार ही सिडकोकडे असून सिडकोने आजपर्यंत उरणच्या नागरिकांसाठी मूलभूत असलेल्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे सिडकोने शंभर कोटी रुपये खर्च करून उरणमधील प्रलंबित असलेल्या शासकीय रुग्णालयाची उभारणी करावी.

– रामचंद्र म्हात्रे,  सामाजिक कार्यकर्ते

उरणमध्ये एकूण १५५ रुग्ण सामावून घेण्यासाठी दोन केंद्र असून बोकडवीरा येथे १२० तर जेएनपीटी रुग्णालयात ३५रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पुढील उपचाराकरिता कामोठे किंवा डी.वाय.पाटील रुग्णालयात पाठविले जाते. आतापर्यंत उरणमध्ये १५५९ रुग्ण आढळले असून ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

-भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:54 am

Web Title: cidco hospital corona covid patient uran new mumbai panvel akp 94
Next Stories
1 करोना मृतांवर मोफत अंत्यविधी
2 रुग्णालय इमारत धोकादायक
3 सातारा पालिका हद्दवाढीच्या श्रेयावरून राजकारण
Just Now!
X