मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक दिवस एकाच चित्रपटगृहात चालणारा ‘सांगत्ये ऐका’, दादा कोंडके यांचा ‘सोंगाडय़ा’ या जुन्या चित्रपटांपासून ‘शाळा’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘जोगवा’ या नवीन मराठी चित्रपटांपर्यंत तसेच ‘मदर इंडिया’, ‘दो बिघा जमीन’, ‘आवारा’, ‘जाने भी दो यारो’ यांसारखे दर्जेदार हिंदी चित्रपट अगदी विनामूल्य पाहण्याची संधी नाशिककरांना १५ फेब्रुवारीपासून मिळणार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षांनिमित्त राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागातर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांमध्ये  शताब्दी सोहळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याअंतर्गत येथे १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महोत्सवात हे चित्रपट पाहता येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम व पर्यटन तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, राज्यमंत्री फौजिया खान यांच्या उपस्थिती आहे. सकाळी नऊ वाजता जुन्या नाशिकमधील फाळके वाडा ते महाकवी कालिदास कलामंदिर अशी शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता कलामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम ‘राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी’ होणार आहे. सर्कल चित्रपटागृहात हे चित्रपट अनुक्रमे दुपारी १२ ते ३, ३ ते ६, ६ ते ९ आणि ९ ते १२ या वेळेत दाखविण्यात येणार आहेत. सर्व चित्रपट विनामूल्य असल्याने रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.