नगर जिल्ह्य़ातून पाणी आणण्याचा प्रस्ताव

बीड : बिंदुसरा धरणात केवळ चार दिवस तर माजलगाव धरणात मे अखेपर्यंत पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याने आता बीड शहरात दहा दिवसाला पाणी पुरवठा होऊ लागला आहे. तर माजलगाव धरणात अधिकचा चर खोदून पाणी आणण्यासाठी दोन कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. दुसरीकडे आष्टी, पाटोदा, शिरुर या तालुक्यातील धरणे कोरडी पडल्याने नगर जिल्ह्यातून पाणी आणण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईने भीषण स्वरुप घेतले असून सुरू असलेल्या साडेसातशे टँकरच्या पाठीमागे घागरभर पाण्यासाठी दहा लाख लोक धावू लागले आहेत.

बीड जिल्ह्यातील बहुतांशी तलावांनी तळ गाठला आहे. केवळ माजलगाव, सिंदफना, धनेगाव, उखंडा या तलावांमध्ये मृत पाणीसाठा असून या पाण्यावरच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिंदुसरा प्रकल्पात केवळ चार दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या शहरात दहा दिवसाला पाणी पुरवठा केला जात असला तरी आता पाणी कमी पडल्याने पुरवठय़ाचे दिवस वाढले जाणार आहेत.

माजलगाव बॅक वॉटरमधून शहराला पाणी पुरवठा होत असला तरी याही धरणात आता पाणी कमी झाले आहे. त्यामुळे चर खोदून पाणी पुरवठा करावा लागणार असल्याने नगर पालिका प्रशासनाने दोन कोटी रुपये खर्चाचा आराखडा प्रशासनाला दिला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सचिव शामलाल गोयल यांनी बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला त्यावेळी आष्टी, पाटोदा, शिरुर या तालुक्यातील पाण्याचे स्रोत जवळपास संपल्यामुळे टँकरला पाणी भरण्यासाठी नगर जिल्ह्यातील प्रकल्पातून परवानगी मिळावी यासाठी नगर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्याचे सांगण्यात आले.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विंधनविहिरींचे अधिग्रहण केले जात आहे व मेहेकरी, सीना व माजलगाव येथील बंधाऱ्यात कुकडी व जायकवाडी येथून पाणी सोडण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत प्रस्ताव पाठवल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

पाण्यामुळे त्वचेच्या समस्या

मृत पाणी साठय़ातून टँकर भरल्यानंतर पाण्याला प्रचंड वास येतो. असे पाणी जनावरेही पित नाहीत. आंघोळ केली तर अंगावर खाज येते अशा प्रकारचे नवीन त्वचेच्या आजाराचे प्रश्नही उभे राहिले आहेत.