27 May 2020

News Flash

‘डीजेमुक्त’ मिरवणुकीची नगरकरांना अपेक्षा

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादित आवाजातील ध्वनिक्षेपकांना पोलिसांची परवानगी

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादित आवाजातील ध्वनिक्षेपकांना पोलिसांनी परवानगी दिली असली तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘डीजेमुक्त’ वातावरणात (आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन) मिरवणूक पार पडण्याचा पायंडा निर्माण होणार की कोणते मंडळ या निर्णयाला ‘खो’ घालणार, याकडेच नगरकरांचे विसर्जन मिरवणुकीत लक्ष लागले आहे. नगरसह जिल्ह्य़ातील प्रमुख शहरात प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका डीजेमुक्त वातावरणात झाल्या होत्या. त्यामुळे आता मंडळांचे कार्यकर्ते व प्रशासन या दोघांवरच प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीची जबाबदारी राहणार आहे.
नगर शहरात रेंगाळणा-या विसर्जन मिरवणुकीमुळे सहभागी होणा-या मंडळांची संख्या रोडावली आहे. काही वर्षांपासून केवळ १४ मंडळे सहभागी होत आहेत, त्यातील ११ तर मानाचीच आहेत. इतरांमध्ये शिवसेना, आनंद ही प्रमुख आहेत. तरीही रेंगाळणे थांबलेले नाही. शहराचे ग्रामदैवत माळीवाडा विशाल गणेश देवस्थान मंदिरातील उत्सवमूर्तीची सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते उत्थापनाची पूजा होऊन १० वाजता रथ रामचंद्र खुंटावर आणला जाईल, तेथे मनपा आयुक्त विलास ढगे यांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीला सुरुवात होईल.
आडते बाजार-दाळमंडई-तेलीखुंट-कापडबाजार-भिंगारवाला चौक-अर्बन बँक रस्ता-नवीपेठ-चितळे रस्ता-चौपाटी कारंजा-दिल्लीगेट या मार्गाने नेप्ती चौकातील बाळाजीबुवा बारवेत विसर्जन होईल. तर सावेडी उपनगरातील मिरवणुकीला सकाळी ११ वाजता प्रोफेसर कॉलनी चौकातुन मनपाच्या गणेशाची मनपा आयुक्तांच्या हस्ते पुजा होऊन मिरवणुकीला सुरुवात होईल. त्याचे विसर्जन पाईपलाईन रस्त्यावरील विहिरीत होईल.
नगरला ३१ तडीपार
विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांनी जिल्ह्य़ात १ हजार ३५८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, त्यात नगर शहरातील ५७६ जणांचा समावेश आहे. शहरातील ३१ जणांना तडीपार करण्यात आले आहे. ध्वनीची मर्यादा मोजण्यासाठी नगर शहरात ३ तर प्रत्येक तालुक्यात एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. मनपाने सहकार्य न केल्याने नगरमधील मिरवणूक मार्गावर पोलिसांनी व्यापा-यांच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. याशिवाय जिल्ह्य़ातील सर्व मिरवणुकांचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे.
 जिल्ह्य़ात ३ हजारांवर पोलीस तैनात
मिरवणुकीसाठी जिल्ह्य़ात सुमारे ३ हजारांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नगर शहराची जबाबदारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे, तर दुसरे अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव यांच्यावर उत्तर जिल्ह्य़ाची सोपवण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी नगरमध्येच थांबणार आहेत. याशिवाय गुजरातमधील केंद्रीय राखीव दल तसेच राज्य राखीव दलाचे जवानही मदतीला घेण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पोलिसांचे कमांडो पथकही तयार करण्यात आले आहे. नगरमधील मिरवणुकीत सहभागी होणा-या प्रत्येक मंडळाबरोबर एक अधिकारी व १० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यांच्या जोडीला महसूलचे अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत.
मागच्या ‘डीजे’ मंडळांना नोटिसा
मागील वर्षीच्या मिरवणुकीत डीजेचा दणदणाट केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केलेल्या शिवसेना मंडळाचे संभाजी कदम, समझोता मंडळाचे शिवाजी कदम, गोरक्षनाथ मंडळाचे (वैदुवाडी) जालिंदर शिंदे, सावेडीतील शिवशक्ती मंडळांना यंदाचा ध्वनिक्षेपकाचा परवाना रद्द का करू नये याबाबत खुलासा करण्याच्या नोटिसा शहराचे पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी बजावल्या आहेत. त्यावर उद्या, रविवारी निर्णय घेतला जाणार आहे.
शिस्तबद्ध मंडळांचा गौरव
विसर्जन मिरवणुकीत शिस्तबद्धतेचे प्रदर्शन करणा-या मंडळांचा तसेच पारंपरिक ढोलवाद्यांची पथके अशा प्रत्येकी तिघांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्याचा निर्णय जिल्हा पोलीस दलाने घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2015 3:36 am

Web Title: citizen of nagar expected dj free procession
Next Stories
1 मिरवणुकीच्या मार्गावर मिरजेत ११ स्वागत कमानी
2 जुळे सोलापुरात कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन
3 गैरव्यवहार उघडकीस येण्याच्या भीतीने इतिवृत्तच गायब केले
Just Now!
X