जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर व्यापारी गाळे, दुकाने बंद

पालघर : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने आणि आस्थापने बंद करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केल्याने बुधवारपासून संपूर्ण पालघरमध्ये शुकशुकाट होता.  प्रशासनाने केलेल्या बंदच्या आवाहनाला दुकानदार व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रशासनाने करोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी आखलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व त्या आदेशांचे व निर्णयाचे स्वागत पालघरमध्ये सर्व स्तरातून होत आहे व हे आदेश काही अपवाद वगळता सर्वजण पाळताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला पालघरवासियांनी चांगला प्रतिसाद दिला असून यामुळे गर्दी कमी होईल व सामाजिक संपर्क कमी झाल्यामुळे या विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता कमी होणार आहे. यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाला सोयीचे जाणार आहे.

शासकीय कार्यालय, बँका, रेल्वे स्थानके, खाजगी व सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असली तरी या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिल्यामुळे याठिकाणी ही गर्दी जमू नये यासाठी सर्वजण प्रयशील आहेत. तसेच या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी पालघर नगर परिषदेसह सर्व आस्थापना प्रयशील असल्याचे दिसून आले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन गांभीर्याने लक्ष देत असून जिल्ह्यतील वैद्यकीय यंत्रणा ही २४ तास यासाठी सतर्क आहे. मंगळवारी बंदचा आदेश दिल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या या आदेशाचे पालन संपूर्ण पालघर शहर करीत असल्याचे पहावयास मिळाले. फळ आणि भाजीविक्रेते, काही ठिकाणी चिकन आणि मटण विक्रेते, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने आणि आस्थापना हे आदेशाचे पालन करताना पहावयास मिळाले.  या आदेशाचे पालन व्हावे यासाठी पालघर पोलिसही प्रयशील होते. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास या आदेशाचे पालन सर्वानी करावे अशा सूचना पोलिस भोंग्याद्वारे करण्यात येत आहे. यानंतर व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन केल्यामुळे सर्व स्तरातून व्यापारी व्यावसायिक व नागरिकांचे स्वागत होत आहे.

मांसाहारात घट

सरकारने तसेच विविध संशोधन संस्थांनी चिकन, अंडी आणि मटण याचा ‘करोना विषाणू’शी संबंध नसल्याचे सांगितल्यानंतरही नागरिकांनी मांसाहार वज्र्य केला आहे. त्यामुळे   चिकन आणि मटण व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत  चिकन १२ रुपये किलो दराने विकले जात होते. तर काही ठिकाणी ५० रुपये किलो दराने चिकनची विक्री करण्यात येत होती.

फळे, भाज्यांना मागणी

भाजी व फळ विक्रेत्यांचा धंदा तेजीत आहे.नागरिक मोठय़ा प्रमाणात शाकाहाराकडे वळल्यामुळे फळे—भाजीपाल्याची मागणी वाढली असून बाजारपेठेतील आवकही वाढली आहे.

‘शेतघरांमध्ये येणाऱ्यांना बंदी घाला’

वाडा, विक्रमगड तालुक्यातील शेतघरांमध्ये (फार्महाऊस) शहरांमधून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शहरातून शेतघरांत येणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही तालुक्यांत ५००हून अधिक शेतघरे आहेत. याशिवाय सुटी साजरी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या घरांची संख्या २ हजारांच्या आसपास आहे. मोठय़ा संख्येने मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतुन नागरिक येतात. करोना च्या पार्श्वभूमीवर शहरी नागरिकांना प्रवेश बंदी करावी अशी मागणी नगरसेवक राम जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.