दुर्गम भागात भ्रमणध्वनी बिनकामाचे असल्याची नागरिकांची तक्रार

वाडा : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात घरात बसून मोबाइल फोन, इंटरनेटच्या माध्यमातून विविध कामे करता येतात. त्याशिवाय कार्यालयीन कामांसाठी सध्या अनेक जण मोबाइलचाच अधिक वापर करत आहेत. मात्र वाडा तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांत अनेक ठिकाणी मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी काही तरुणांनी तर चक्क उंच झाडांचा आसरा घेतला आहे.

वाडा तालुक्यातील उज्जेनी, आखाडा, मांगरुळ, ओगदा, पाचघर अशा अनेक गावांत कुठल्याही मोबाइल कंपनीचे नेटवर्क येत नाही. त्यामुळे नेटवर्क मिळवण्यासाठी येथील तरुण जंगलात जाऊन तेथील उंच झाडावर चढून नेटवर्क मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बीएसएनएलचे नेटवर्क शहरातही उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागांत तर

बीएसएनएलचा बोऱ्या वाजलेला आहे. खेडोपाडय़ात विविध कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात टॉवरचे जाळे पसरून नेटवर्क देण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी ग्रामीण व दुर्गम भागात अजूनही याबाबतीत कुठल्याही मोबाइल कंपनीने यावर मार्ग न काढल्याने दुर्गम भागातील शेकडो मोबाइलधारकांना मोबाइल खरेदी करून त्याचा फारसा उपयोग करता आलेला नाही.

ग्रामीण, दुर्गम भागातील तरुण जवळपासच्या जंगलात जाऊन एखादे उंच झाड शोधून त्यावर चढून मोबाइलची रेंज शोधत आहेत. तासन्तास प्रयत्न करून रेंज मिळाली तर या तरुणांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

वाडा तालुक्यातील ग्रामीण भागांत कोणत्याही कंपनीच्या सीमकार्डला रेंज मिळत नाही. रेंजअभावी मोबाइल बंद पडले आहेत.

– प्रदीप कुवरा, ग्रामस्थ, आखाडा, वाडा तालुका