नागरिकांनी नाकारले; केवळ २.६९ टक्केच मते

राजेश्वर ठाकरे, नागपूर</strong>

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कौल घेणाऱ्या विदर्भवाद्यांना विदर्भातील नागरिकांनी पुन्हा एकदा साफ नाकारले आहे. विविध विदर्भवादी पक्षांच्या आघाडीने विदर्भात आठ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांना एकूण मतांपैकी केवळ २.६९ टक्के मते मिळाली. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ ही लोकांची मागणी आहे की फक्त नेत्यांची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या संघटना आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ‘विदर्भ निर्माण महामंच’ स्थापन केला. यासाठी विदर्भाची मागणी रेटून धरणाऱ्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुढाकार घेतला होता. समितीने आघाडीतील इतर संघटनांचे उमेदवार रिंगणात उतरवले होते. सुरुवातीला आम आदमी पक्ष या आघाडीत होता. मात्र नंतर त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या वाटय़ाच्या अकोला आणि चिमूर-गडचिरोली या दोन जागांवर उमेदवार उभा केला नव्हता. उर्वरित सात जागांवर विदर्भवाद्यांचे उमेदवार होते. या सातही जणांच्या एकूण मतांच्या टक्केवारीची बेरीज ०.९३ टक्के होती.

विदर्भ राज्य निर्माण महामंचने यवतमाळ-वाशीम मतदारसंघात ‘प्रहार जनशक्ती’च्या उमेदवार वैशाली येडे यांना समर्थन दिले होते. वैशाली येडे यांचे पती शेतकरी होते. त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांना २० हजार ६२० मते (१.७६ टक्के) मिळाली. विदर्भवाद्यांची आणि समर्थक उमेदवार यांच्या मतांची टक्केवारी २.६९ एवढी होते.

महामंचचे नागपुरातील उमेदवार डॉ. सुरेश माने यांना सर्वाधिक ३ हजार ४१२ (०.२९ टक्के) मते मिळाली. चंद्रपूर येथे दशरथ मडावी यांना ३ हजार १०३ (०.२५ टक्के) मते मिळाली. महामंचच्या उमेदवारांना कमाल ०.२९ टक्के आणि किमान ०.११ टक्के मते मिळाली आहेत. या मतांच्या टक्केवारीवरून विदर्भ राज्याच्या मागणीला विदर्भातील नागरिकांनी अव्हेरल्याचे दिसते.

या संदर्भात विदर्भ राज्य निर्माण महामंचचे समन्वयक राम नेवले म्हणाले, ऐनवेळी उमेदवार ठरले. त्यांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. तसेच प्रचार साहित्याची उणीव आणि आर्थिक अडचणींमुळे लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे मतांची टक्केवारी कमी दिसते. याच अर्थ विदर्भातील नागरिकांना वेगळे राज्य नको आहे, असा होत नाही.

विदर्भवादी उमेदवारांची  कामगिरी

डॉ. सुरेश माने- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (नागपूर, ३४१२), देवीदास लांजेवार- विदर्भ राज्य आंदोलन समिती (भंडारा, १५४९), चंद्रभान रामटेके-राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी (रामटेक, १७७९), दशरथ मडावी (चंद्रपूर, ३१०३), प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर- लोक जागर पार्टी (वर्धा, ११३५), नरेंद्र कठाणे- राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी (अमरावती, १६५४) आणि गजानन हरणे- अपक्ष (अकोला, १२७८), विदर्भ राज्य निर्माण महामंचने समर्थन प्राप्त वैशाली येडे, प्रहार जनशक्ती पक्ष (यवतमाळ-वाशीम, २०,६२०) यांना मते मिळाली.