१८ वर्षांवरील लसीकरणाची नगर शहरात सुरुवात

नगर: १८ वर्षे वयावरील नागरिकांच्या लसीकरणाला नगर शहरात काल, शनिवारपासून सुरुवात झाली. त्यासाठी ‘कोविशिल्ड’ लसीचे १० हजार डोस प्राप्त झाले आहेत. काल दिवसभरात ‘कोविन अ‍ॅप’वर नोंदणी केलेल्या ९१९ जणांचे लसीकरण करण्यात आले. मात्र नोंदणी न केलेल्या नागरिकांची लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी उसळत असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांना आवरण्याचे अतिरिक्त काम करावे लागत आहे. या गर्दीमुळे लसीकरण केंद्रावर अडथळेही निर्माण होत आहेत. महापालिकेने या संदर्भातील नियोजन करण्याची आवश्यकता नगरसेवक व्यक्त करत आहेत. ग्रामीण भागातील १८ वर्षे वयावरील नागरिकांचे अद्याप लसीकरण सुरू झालेले नाही.

महापालिकेच्या वतीने १८ वर्ष ते ४४ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची सुरुवात जिजामाता आरोग्य केंद्रात आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी उपायुक्त यशवंत डांगे, तसेच डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. याचबरोबर लसीकरण गरजेचे आहे. लवकरात लवकर जास्त लसीकरणाचे डोस प्राप्त करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, असे प्रतिपादन आ. जगताप यांनी केले.

आयुक्त शंकर गोरे म्हणाले,की १८ वर्ष ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा कार्यक्रम शहरात सुरू झाला असून महापालिकेला शासनाकडून १० हजार डोस उपलब्ध झाले आहेत. शहरांमध्ये ५ लसीकरण केंद्रांवर दररोज १ हजार ५०० डोस दिले जाणार आहेत.

यासाठी नागरिकांनी ‘आरोग्य सेतू अ‍ॅप‘वर नोंदणी करणे बंधनकारक असून सर्व नागरिकांनी नाव नोंदणी करावी.

 

दुसऱ्या डोससाठी दोन केंद्र

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ‘कोविन अ‍ॅप‘वर नोंदणी केल्यानंतर कोणत्या दिवशी लसीकरण करायचे याची तारीख दिली जाते. त्या तारखेला नागरिकांनी संबंधित केंद्रावर उपस्थित राहायचे आहे, अशी माहिती मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची व्यवस्था केडगाव आरोग्य केंद्र, म. फुले (माळीवाडा), जिजामाता (बुरुडगाव रस्ता), नागापूर व मुकुंदनगर आरोग्य केंद्रांवर करण्यात आली आहे, तर ४५ वर्षांवरील नागरिक, ज्यांना दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यांच्या लसीकरणाची व्यवस्था तोफखाना व सावेडी आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे.

प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र करा

लसीकरणासाठी नागरिकांची आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी निर्माण होत असल्याने महापालिकेने त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. गर्दी टाळण्यासाठी मनपाने प्रत्येक प्रभागात लसीकरणाचे केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली.