एकीकडे गॅस्ट्रो, अतिसाराने शहर त्रस्त असताना महापालिकेतील प्रतिनिधी आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात दंग असल्याचे संतापजनक चित्र समोर येत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपला भरभरून साथ देणाऱ्या सांगली मिरजेत साथीच्या आजाराचे थमान असताना केवळ फोटो काढण्यासाठी रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्याचा देखावा निर्माण करीत आहेत.
मिरजेतील ब्राह्मणपूरी, विजापूर वेस, टाकळी रस्ता, गोदड मळा, कोकणे गल्ली, सहारा कॉलनी, शास्त्री चौक, नदीवेस आदी भागांत गॅस्ट्रोचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून आले. शहरात अकरा जणांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र जुनाट यंत्रणेमुळे या प्रयत्नांना मर्यादा पडल्या.
तथापि, महापौर, उपमहापौरासह गट नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गॅस्ट्रोच्या साथीला महाआघाडीचा कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करीत आरोग्य यंत्रणा करीत असल्याच्या उपाययोजनांचा पाढा वाचला. मात्र कमीअधिक प्रमाणात आता सत्तेत असणारी मंडळीच महाआघाडीचे शिलेदार होते, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मिरजेच्या कला विकासासाठी साडेसहा कोटींचा निधी उपलब्ध होऊ शकला, मात्र कालबाह्य झालेल्या पाण्याच्या वितरण नलिका आणि ड्रेनेज नलिका बदलण्यास पसे मिळू शकले नाहीत.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधा-यांवर शरसंधान करीत असताना संवेदनशून्यतेचा कारभार असे म्हटले आहे. मात्र ठराविक लोक वगळता शहरात मोडकळीस आलेली ड्रेनेज व्यवस्था, विस्तारित भागातील पाणीपुरवठा याबाबत गांभीर्याने सभागृहात चर्चा होत नाही. शेरी नाल्याचे पाणी आजही सांगलीत वसंतदादा समाधिस्थळानजीक कृष्णेच्या पात्रात मिसळत आहे. याबाबत सर्व एक होऊन निर्णय होऊ शकलेला नाही.
शहरात कचरा उठाव आणि विल्हेवाट हा तर संशोधनाचा विषय आहे. मुख्य रस्त्यावर असणारा आणि तात्काळ दिसून येणारा कचरा उचलला जातो. मात्र विस्तारित भागात कधीतरी झाडलोट दिसत असते. आरोग्यसुविधा पुरविणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य असताना केवळ ठेकेदारी पोसण्याचा उद्योग या माध्यमातून होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या आरोपाचे खंडण कामाच्या माध्यमातून होत असल्याचे दुर्दैवाने दिसत नाही.
गॅस्ट्रोचे आणखी १३ रूग्ण दाखल
शहरात शुक्रवारी आणखी गॅस्ट्रोचे १३ रूग्ण दाखल झाले असून खासगीसह शासकीय रूग्णालयात गॅस्ट्रोवर उपचारासाठी दाखल असणाऱ्या रूग्णांची संख्या ३५ असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पुण्याच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त संचालक श्रीमती कांचन जगताप यांनी आज गॅस्ट्रोग्रस्त भागाची पाहणी केली.
मिरज शहरात गेल्या आठवडाभराच्या कालावधीत गॅस्ट्रोने अकरा जणांचा बळी गेला असून आजही जुलाब व उलटीने त्रस्त असणारे १३ रूग्ण उपचारासाठी दाखल झाले. यापकी ११ रूग्ण शासकीय व २ खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. रूग्णालयात दाखल असणाऱ्या रूग्णांची संख्या आज सायंकाळी ३५ होती. त्यापकी २८ रूग्ण शासकीय रूग्णालयात दाखल आहेत.
पुणे येथील आरोग्य विभागाच्या संयुक्त संचालक श्रीमती कांचन जगताप यांनी आज शासकीय व महापालिकेच्या रूग्णालयास भेट देउन उपचारासंदर्भात माहिती घेतली. तसेच शहरातील गॅस्ट्रोने ग्रस्त असलेल्या भागाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी श्रीमती बी. के. दळवी आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी या होत्या.