माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लोकोपयोगी कामे करण्याच्या प्रेरणेतूनच लातूर शहरात त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून नव्याने शहर बसवाहतूक सेवा सुरू होत असून, टप्प्या-टप्प्याने शहरात ६० बसेस धावतील. शहराच्या सर्व भागात सामान्य नागरिकांची सोय या सेवेने होणार असल्याचे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केले.
गंजगोलाई येथे शहर बसवाहतूक सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार डॉ. सुनील गायकवाड, महापौर अख्तर मित्री, उपमहापौर कैलास कांबळे, विरोधी गटनेते मकरंद सावे, नरेंद्र अग्रवाल, मोईज शेख, व्यंकट बेद्रे, विक्रांत गोजमगुंडे, सुनील बसपुरे, दीप्ती खंडागळे, विक्रम हिप्परकर, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, आयुक्त सुधाकर तेलंग उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले, की शहरात पूर्वी बसवाहतूक सेवा सुरू होती. मात्र, ही सेवा चालवणाऱ्या प्रमुखाचा खून झाल्यामुळे ती बंद पडली. नव्याने केंद्र सरकारच्या जेएनआरयुएम योजनेंतर्गत बसवाहतूक सेवा सुरू केली जात आहे. ६० बसेस महापालिकेसाठी मंजूर झाल्या आहेत. यातील दोन बसेसद्वारे शुभारंभ होत असून, या सेवेमुळे सामान्य नागरिकांना कमी पशात शहराच्या विविध भागात फिरता येणार आहे. लवकरच ६० बसेस सेवेत दाखल होतील. महापालिकेच्या वतीने पे अँड पार्क व्यवस्था केली जाईल. त्यातून शहरात वाहतुकीला वळण लागेल. पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेता नागरिकांनी जलपुनर्भरण योजनेत सहभाग द्यावा. पाण्याचा वापर जपून करता येण्यासाठी नळाला मीटर लावून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
खासदार गायकवाड यांनी शहर विकासासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती केली, त्यावर शहर बसवाहतूक चालवली तर त्याचा लाभ होईल. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. महापौर शेख यांनी बससेवेत अपंगांना व विद्यार्थ्यांना निम्म्या दराची सवलत असल्याचे सांगितले. सुंदर, सुरक्षित व सुरळीत लातूरसाठी सर्वानी योगदान देण्याचे आवाहन केले.
‘तुम्ही योजना आणा,
आम्ही त्या राबवू’!
खासदार गायकवाड यांनी लातूर शहर विकासासाठी केंद्राच्या योजनेतून सहकार्याचे आश्वासन दिले. तो धागा पकडून आमदार अमित देशमुख म्हणाले, की केंद्रात व राज्यात तुमचे सरकार आहे. तुम्ही शहरासाठी ज्या-ज्या योजना आणाल त्याची अंमलबजावणी शंभर टक्के होईल, याची आम्ही काळजी घेऊ. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण करण्याचे आपण आश्वासन दिले. त्यानुसार आपली वाटचाल सुरू असल्याबद्दल अभिनंदन केले.