बँकिंग व अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक, शहर सहकारी बँकेचे संस्थापक संचालक, माजी नगरसेवक, अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले प्रा. मुकुंद रामचंद्र घैसास यांचे आज, शनिवारी सकाळी आजारपणात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. घैसास यांच्यावर सायंकाळी अमरधामध्ये विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहर विकासाची आस असलेला कार्यकर्ता हरपला, अशी भावना व्यक्त होत आहे. ‘घैसास सर’ या नावाने ते परिचित होते. डबघाईला आलेल्या शहर बँकेला त्यांच्याच योगदानातून लौकिक प्राप्त झाल्याने बँक त्यांच्याच नावाने ओळखली जाते.
श्वसन व मूत्रपिंडाचा त्रास होत असल्याने काही दिवसांपासून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शहरात याची माहिती मिळताच अनेकांनी सावेडीतील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान त्यांचे पार्थिव नव्या पेठेतील बँकेच्या मुख्य शाखेत दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे मोठा जनसमुदाय उपस्थित होता. नंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली व सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बँकिंग, राजकिय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
घैसास यांनी अर्थशास्त्र, बँकिंग, फायनान्स, कॉस्ट अकौंटन्ही, कायदा विषयात उच्च शिक्षण घेतले होते. शिक्षकी पेशा त्यांच्या आवडीचा असल्याने त्यांनी सुरुवातीच्या काळात पेमराज सारडा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. १९६५ च्या दरम्यान इन्स्टिटयूट ऑफ कॉमर्स संस्था सुरु करुन सन २००० पर्यंत शिकवणी वर्ग चालवले. सहकारी बँका, पतसंस्था यांना प्रशिक्षण देणाऱ्या यशदा, वैकुंठभाई मेहता सहकारी प्रशिक्षण संघ, राज्य सहकारी संघ, गुजरात फेडरेशन येथे त्यांनी व्याख्याते म्हणुन काम केले. महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे काही काळ अध्यक्ष होते. राज्य सहकारी बँकेचेही ते संचालक होते. रिझर्व बँकेच्या अभ्यास गटावरही (विश्वनाथन कमिटी) त्यांची नियुक्ती झाली होती. राज्य वित्त आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.
सुरुवातीच्या काळात ते जनता पक्षात होते, नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत होते. १९७४ ते १९८२ व १९९१ ते ९६ या काळात त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम केले. या काळात त्यांनी शहर विकासासाठी विशेष योगदान दिले. सावेडीची भुयारी गटार योजना मार्गी लावण्यासाठी त्यांची धडपड होती. पाणी प्रश्नाचाही त्यांचा विशेष अभ्यास होता. शहर मतदारसंघातून त्यांनी १९८० मध्ये विधानसभेची निवडणुकही लढवली होती. विविध सामाजिक उपक्रमात ते हिरीरीने सहभागी होत. मात्र नंतर त्यांनी बँकिंग हे कार्यक्षेत्र ठरवून शहर बँकेचे ४० वर्ष नेतृत्व केले.
खासदार दिलीप गांधी , आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, माजी आमदार अनिल राठोड, दादा कळमकर व भानुदास मुरकुटे, हिंद सेवा मंडलाचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, मर्चंट बँकेचे अनिल पोखर्णा, शहर बँकेचे अध्यक्ष डॉ. विजय भंडारी, संचालक अशोक कानडे, नगर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शैलेश मुनोत, सुभाष गुंदेचा, सुधीर मेहता आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.
अमरधाममध्ये झालेल्या शोकसभेत विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विविध उपक्रमात सहभागी होणारे घैसास सर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते, त्यांनी बँकेला वैभवाच्या शिखरावर नेतानाच अनेकांची आयुष्यही घडवले, त्यांच्याकडे शहर विकासाची तळमळ होती, विद्यार्थी घडवण्याबरोबरच त्यांच्यावर संस्कार करण्याचाही त्यांचा प्रयत्न होता, नगरसेवक म्हणून काम करताना जनतेला सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी ते आग्रही रहात, आपल्या कामातून त्यांनी ठसा उमटवला, अशा शब्दात खासदार दिलीप गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.