|| नीरज राऊत

स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर पती शिवसेनेत असल्याने द्विधा मन:स्थिती:- जनतेकडून थेट निवडून आलेल्या पालघरच्या नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांच्यासमोर या निवडणुकीत एक वेगळाच पेचप्रसंग उभा राहिला आहे. आपण ज्या पक्षातून नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलो, त्या आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मैदानात उतरणे त्यांना कठीण होऊन बसले आहे. त्यांचे पती शिवसेनेत आहेत आणि त्या स्वत: राष्ट्रवादीत असल्याने द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यामुळे उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी त्या दिवसभर लोकांच्या सेवेकरिता नगर परिषदेमध्ये काम करत बसण्याचे पसंत करीत आहेत.

सुरुवातीला काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या डॉ. उज्ज्वला काळे यांना मार्च २०१९मध्ये झालेली थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेसतर्फे लढवायची होती. मात्र एकंदर काँग्रेस पक्षाची शहरातील ताकद तसेच नगर परिषदेत राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक निवडून आले असल्याने २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या पक्षांमध्ये झालेल्या निवडणूक आघाडीने नगराध्यक्षपदाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिली होती. अखेर ही निवडणूक डॉ. काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आघाडीतर्फे लढल्या आणि त्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या.

डॉ. उज्ज्वला काळे यांचे पती केदार काळे हे त्या वेळी काँग्रेस पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांना काँग्रेस पक्षामधून विविध कारणांमुळे विरोध होत होता. अखेर जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी होणार याचे संकेत मिळतात, त्यांनी पक्षांतर करून शिवसेना पक्षात प्रवेश केला. सध्या ते शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदावर कार्यरत आहेत.

पालघरचे आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असताना त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये नगराध्यक्ष डॉ. काळे यांनी सहभागी व्हावे यासाठी एका नगरसेविकेने त्यांना दूरध्वनी केला होता. मात्र आपल्यासमोर पेचप्रसंग निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी आपण सध्या राजकीय प्रचारात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी कळवले.

एकीकडे ज्या पक्षाच्या चिन्हावरून निवडून आलो आणि ज्या पक्षाने मित्रपक्षांनी आघाडीचा धर्म पाळून आपल्याला निवडून दिले, त्यांचा प्रचार केला तर आपले पती नाराज होतील; दुसरीकडे आपल्या पतीने ज्या पक्षात प्रवेश केला आहे त्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला तर आपल्या मूळ पक्षाशी गद्दारी केल्यासारखे होईल अशा द्विधा मन:स्थितीत आणि पेचप्रसंगात पालघरच्या नगराध्यक्ष सापडल्या आहेत. यावर उत्तम तोडगा म्हणून सध्या कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला व प्रचार सभेला न जाता त्यांनी दिवसभर पालघरच्या नागरिकांच्या सेवेकरिता नगर परिषद कार्यालयात उपलब्ध राहण्याचा मार्ग पसंत केल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.