News Flash

“नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा”; उद्धव ठाकरेंना आमदाराने सूचवलं नाव

"हे आपल्यासारख्याला शोभत नाही"

संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना पुन्हा एकदा नामांतराच्या मुद्द्याची ठिणगी पडली आहे. नामांतराचा हा वणवा आता महाराष्ट्रभर पसरताना दिसतोय. औरंगाबाद पाठोपाठ अनेक शहरांची नावं बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. नामांतराच्या या मागण्यांवर सपाच्या नेत्यानं भूमिका मांडत महाराष्ट्राचंच नाव बदलण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा भाजपानं उपस्थित केला होता. त्यानंतर अनेक शहरांची नावं बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. यावरून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्येच मतभेद असून, भाजपाकडून सातत्यानं या मुद्द्यावर जोर दिला जात असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा- औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीतील विरोधाभासावर अजित पवाराचं भाष्य; म्हणाले…

शहारांची नावं बदलण्याची मागणी जोर पकडत असतानाच महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानंही स्पष्ट भूमिका मांडत नामांतराला विरोध दर्शवला आहे. सपाचे नेते आमदार अबू आझमी यांनी एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे. “शहरांची नावं बदलून कुणाचं पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल, तर नवी शहरं वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीनं नामांतर करणं योग्य नाही. नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या. रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणं हे आपल्याला शोभत नाही,” असं आवाहन अबू आझमी यांनी केलं आहे.

आणखी वाचा- ‘तो’ प्रस्ताव दिल्लीत का रखडला हे भाजपाने जनतेला सांगावं; संजय राऊतांचा थेट सवाल

“हे आपल्यासारख्याला शोभत नाही”

“महाराष्ट्रात जगभरातून, देशातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढं घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचं कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचं काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही,’ असं आझमी यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 12:24 pm

Web Title: city renaming politics in maharashtra mla suggests new name for maharashtra uddhav thackeray abu azami bmh 90
Next Stories
1 सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
2 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर यांचं निधन
3 विलक्षण! माकडाने हनुमान मंदिरात बजरंगबलीला दंडवत घालत सोडले प्राण, सांगलीतील घटना