नगर : शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे आज, मंगळवारी सायंकाळी शहराच्या बऱ्याच भागाला पाणीपुरवठा झाला नाही. उद्याही, बुधवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे.

नगर-मनमाड महामार्गावर नांदगाव शिवारात (ता. नगर) महापालिकेच्या वतीने अमृत पाणीपुरवठा योजनेत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

ही जलवाहिनी टाकण्यासाठी पोकलेनमार्फत खोदाई सुरू होती. या यंत्राचा धक्का जुन्या मुख्य जलवाहिनी लागून आज सायंकाळी ४ च्या सुमारास ती फुटली. त्यामुळे मुळानगर येथील उपसा बंद ठेवण्यात आला.

मनपाने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले मात्र त्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे आज नागापूर, बोल्हेगाव, पाइपलाइन रस्ता, बुरुडगाव रस्ता, सारसनगर, मुकुंदनगर, केडगाव, कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर या भागास पाणीपुरवठा झाला नाही. आता तो या भागात उद्या, बुधवारी (दि. ९) केला जाईल. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगल गेट, रामचंद्र खुंट, झेंडी गेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, सर्जेपुरा, धरती चौक, माळीवाडा या भागास उद्या, गुरुवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.