आज दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील घटना वाघाच्या हल्यात एक वयस्कर नागरीक ठार झाला आहे. भंडगां येथे राहणारे पुनाजी मोहन मेश्राम ( ६१ वर्ष) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पुनाजी मेश्राम हे गोरेगाव वनपरिक्षेत्रात पिंडकेपार जंगलालगत शेळ्या चारायला गेले होते. दरम्यान त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

हा वाघ वाघीण टी-१४ चा बछडा आहे. गेल्या २-३ महिन्यापासून हा वाघ गोरेगाव वनपरिक्षेत्रात क्षेत्रात भ्रमण करीत आहे. जंगल क्षेत्रालगत विशेष काळजी घेवून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

पारनेर तालुक्यात पट्टेरी वाघ आढळला

यापुर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या पश्चिम भागात म्हस्केवाडी (अळकुटी) शिवारात दुर्मीळ पट्टेरी वाघ आढळल्याने परिसरात दहशत पसरली आहे. म्हस्केवाडी येथील दोन तरुणांना १७ जुलै रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अळकुटी-म्हस्केवाडी रस्त्यावर हा पट्टेरी वाघ दिसला.या तरुणांनी या वाघाची ध्वनीचित्रफीत तयार केली. दरम्यान हा पट्टेरी वाघ भीमाशंकर (जुन्नर) परिसरातील जंगलातून आला असावा, अशी शक्यता वन्यजीव अभ्यासक विनोद बारटक्के (पुणे) यांनी वर्तवली आहे.

वाघाच्या हल्ल्यात दुचाकीवरुन जाणारे दोघे ठार

उत्तर प्रदेशमधील पिलभीत व्याघ्रप्रकल्पामधील देवरिया रेंजमध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. मरण पावलेल्या दोघांसोबत प्रवास करणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीने जवळच्या झाडावर चढून स्वत:चा जीव वाचवला. ही तिसरी व्यक्ती रात्रभर झाडावर बसून असल्याची माहिती समोर आली आहे.