परभणी लोकसभा मतदारसंघात मागील तुलनेत या वेळी १० टक्क्य़ांनी मतदान वाढले. हा वाढलेला टक्का कोणाला फायदेशीर व कोणाला धोकादायक, यावर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू आहे. मतदान यंत्रांत दोन्ही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य बंद झाले असले, तरी दोन्ही उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्येही विजयाबाबत खात्री दिली जात आहे.
या वेळी तब्बल ६४.३१ टक्के मतदान झाले. पाच वर्षांतच मतदानात झालेली १० टक्क्यांची वाढ कोणाला फायदेशीर ठरेल, या बाबत गप्पांचे फड रंगले आहेत. सर्वाधिक मतदान जिंतूर तालुक्यात झाले. २ लाख १६ हजार ५१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या विधानसभा मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी ६८.३२ आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचे हे कार्यक्षेत्र. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी भांबळे यांच्याविरोधात सर्व शक्ती पणाला लावली. जिंतूर विधानसभा मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांची जाहीर सभा घेऊन भांबळे यांची मते कापण्याचा प्रयत्न झाला. या प्रयत्नांना कितपत यश मिळाले, हे निकालानंतरच समजणार आहे. तथापि या मतदारसंघात मतदान मात्र चुरशीने झाल्याने मतदानाचा टक्का वाढला. बोर्डीकरांनी टोकाचा विरोध केल्यानंतर भांबळे समर्थकांनी मतदान प्रक्रियेत शर्थीने सहभाग नोंदवला. शिवसेना उमेदवार संजय जाधव यांच्या परभणी विधानसभा मतदारसंघात १ लाख ७४ हजार ७०४ मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघात ६४.२० टक्के मतदान झाले. हे मतदान नेमके कोणाला फायद्याचे ठरले, यावर दोन्ही बाजूंनी दावे केले जात आहेत. परभणी शहरात राष्ट्रवादीला आघाडी मिळेल, असा दावा या पक्षातर्फे केला जात आहे. मात्र, शहरात मिळालेली आघाडी आम्ही ग्रामीण भागात कमी करू, असा शिवसेनेला विश्वास आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघात २ लाख १५ हजार ५२८ मतदारांनी मतदान केले. आमदार मीरा रेंगे याचे प्रतिनिधित्व करतात. सेनेला पाथरीतून आघाडी मिळण्याची शक्यता वाटते. राष्ट्रवादीचीही याच मतदारसंघावर मोठी भिस्त आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी, राजेश विटेकर आदी कार्यकर्त्यांच्या बळावर या मतदारसंघात मताधिक्य मिळेल, असे राष्ट्रवादीला वाटते. झालेल्या ६६.४८ टक्के मतदानामध्ये कोणाचा वाटा किती, यावर निकालाची गणिते अवलंबून आहेत.
मतदारांच्या बाबतीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाने या वेळी मोठी आघाडी घेतली. मुळात हा सर्वाधिक मतदारसंख्येचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात २ लाख २६ हजार २३३ मतदारांनी मतदान केले. आमदार सीताराम घनदाट यांनी आपली सर्व रसद सेना उमेदवार जाधव यांच्या पाठीशी उभी केली. या मतदारसंघात ६३.५७ टक्के मतदान झाले. घनदाट यांची मदत सेनेला किती झाली या बाबत वस्तुनिष्ठ आकडेवारी निकालानंतरच कळणार असली, तरी या मतदारसंघात सेनेला मताधिक्य मिळेल, असे राष्ट्रवादीलाही वाटते. तब्बल ३० हजारांचे मताधिक्य या मतदारसंघातून मिळेल, असा दावा सेनेच्या वतीने केला जातो. सेनेला मिळणारे मताधिक्य १० हजारांहून अधिक नसेल, असे राष्ट्रवादीचे मत आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात असलेल्या डोंगराळ टापूत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मतदार जास्त संख्येने असल्याने महायुतीला या मतदानाविषयी मोठा विश्वास आहे.
परतूर व घनसावंगी हे जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत. परतूर मतदारसंघात १ लाख ५४ हजार ५४१ मतदारांनी, तर घनसावंगी मतदारसंघात १ लाख ७१ हजार ८५० मतदारांनी मतदान केले. घनसावंगी हा मंत्री राजेश टोपे यांचा प्रभाव असलेला भाग. त्यांच्यामुळे मताधिक्य मिळेल, असे राष्ट्रवादीला वाटते. या मतदारसंघाने गेल्या निवडणुकीत सुरेश वरपुडकर यांना मोठे मताधिक्य दिले. या वेळी ६२.४८ टक्के मतदानात आम्ही तोडीस तोड मतदान मिळवले, असा शिवसेनेचाही दावा आहे. परतूरमध्ये आमदार सुरेश जेथलिया यांची मदत राष्ट्रवादीला किती झाली, या बाबतही उत्सुकता आहे. या मतदारसंघात ५९.७४ टक्के मतदान झाले. १ लाख ५४ हजार ५४१ मतदारांनी मतदान केले. सेनेला परतूरमध्ये मोठी आशा आहे. राष्ट्रवादीला जिंतूरसह परभणी, पाथरी, घनसावंगी हे मताधिक्य देणारे मतदारसंघ वाटतात, तर सेनेला गंगाखेडसह पाथरी, परतूर, घनसावंगी मतदारसंघांत अधिक्य मिळण्याची आशा आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघात १९८९ पासून शिवसेनेला राजकीय यश मिळत आले आहे. यात काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत बेदिलीचा मोठा वाटा आहे. विशेषत गेल्या ३-४ लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत सत्तास्पर्धा शिवसेनेला साह्य़भूत ठरली. या निवडणुकीत आमदार बोर्डीकर व घनदाट यांची सेनेला मोठी मदत झाली. राष्ट्रवादीला स्वकीयांकडूनच मतदानाच्या दोन दिवस आधी दगाफटका झाला. बाहेरुन मिळणारी रसद सेनेला किती लाभदायी ठरते, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.