आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील स्वाभिमानी पक्ष तसेच राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्य़ातील काही जागांवर लक्ष ठेवून आहेत. स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी थेट भोकर मतदारसंघात हात घातला, तर रासपला लोहा व मुखेड मतदारसंघात पाय रोवायचे आहेत.
खासदार शेट्टी तसेच रासपचे महादेव जानकर गेल्या आठवडय़ात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने येथे आले होते. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती अंतर्गत जागा वाटपाची बोलणी होण्यापूर्वी या युतीतील शिवसेना व भाजपा यांच्यातील जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशामुळे भाजपाला गेल्यावेळच्या तुलनेत जास्त जागा हव्या आहेत. पक्षाच्या जिल्हा शाखेने मुखेड व लोहा मतदारसंघ आपल्यासाठी सोडवून घ्या, अशी शिफारस राज्य शाखेकडे केलेली असताना रासपने लोहा-कंधार मतदारसंघावर दावा ठोकत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. मुखेड मतदारसंघातही आमचा उमेदवार उभा राहील, असे जानकर यांनी येथे जाहीर केले.
दरम्यान स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी तसेच प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत शनिवारी जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले होते. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ६५ जागा निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर नांदेड दौऱ्यावर आलेल्या शेट्टी यांनी मराठवाडय़ातील भोकर व पाथरी या दोन जागांसाठी आपण आग्रह धरणार असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रभाव क्षेत्र म्हणून भोकर मतदारसंघ ओळखला जातो. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना या मतदारसंघात २००९ च्या विधानसभा निवडणुकीतील मताधिक्याच्या तुलनेत खूप कमी मताधिक्य मिळाले आणि आता विधानसभेसाठी ते स्वत: उमेदवार नसल्यामुळे विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू झाली. खासदार शेट्टी यांचा दौरा त्याचाच एक भाग होता. मुदखेडच्या कार्यक्रमात त्यांनी भोकरसंदर्भात वक्तव्य केले नाही, पण येथून पुण्याला रवाना होण्यापूर्वी भोकरची जागा आमच्यासाठी सोडा, असा आग्रह आम्ही जागावाटपाच्या चर्चेत धरणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीचा जिल्ह्य़ात पार धुव्वा उडाला होता. त्या वेळी शिवसेनेने सात तर भाजपाने दोन जागा लढविल्या. आता त्यांचे मित्रपक्ष वाढले आहेत. त्यातील दोन नव्या पक्षांनीच तीन जागांवर दावा सांगितल्यानंतर खासदार रामदास आठवलेंचा पक्ष कोणत्या जागेवर दावा सांगतो, याकडे लक्ष लागले आहे.
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणूक काळातच मुखेड व लोहा मतदारसंघ भाजपासाठी सोडवून घेण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार पक्षाच्या जिल्हा शाखेने प्रदेश शाखेकडे या दोन मतदारसंघांची शिफारस केली असल्याचे सांगण्यात आले.