वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत राडा
वाढदिवसाच्या निमित्तावरुन शहराच्या मध्यवर्ती तोफखाना भागात राष्ट्रवादी व काँग्रेसमधील दोन गटात, मध्यरात्री जोरदार धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजुंकडून सोडावॉटरच्या बाटल्या व दगडफेक करण्यात आली, काही वाहनांची मोडतोडही करण्यात आली. तलवारीने वार करण्यात आल्याने तिघे जखमी झाले. जंगुभाई तालीम परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव व राष्ट्रवादीचे सुरज सुभाष जाधव (जाधव वडेवाले) या दोन गटांत जोरदार हाणामाऱ्या रंगल्या. सुरज जाधव हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप समर्थक आहेत. माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचा काल, शनिवारी वाढदिवस होता. तर आ. संग्राम जगताप यांचा आज, रविवारी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने दोन्ही गटात शुभेच्छा फलकांचे युद्ध दिल्लीगेट भागात सुरु होते, दोन्ही बाजूंनी फलक उभारले गेले आहेत. त्याचीच ठिणगी पडली. राष्ट्रवादीमधील गटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे आज, रविवारी, आ. जगताप यांच्या वाढदिवसाचे नियोजन केले होते. त्याला काँग्रेसच्या समर्थकांचा आक्षेप होता. जंगुभाई तालीम ठिकाणी धनंजय जाधव यांचे समर्थक तेथे रात्री ११ च्या सुमारास केक कापुन, फटाके वाजवून व स्पीकर लावून वाढदिवस साजरा करत होते. त्यास राष्ट्रवादीचे सूरज जाधव यांनी हरकत घेतली. दोन्ही गट परस्परांना भिडले. लाकडी दांडके, काढय़ा, तलवारींचा वापर करण्यात आला. दगडफेक झाली. सूरज जाधव यांच्या कारची, त्यांच्या वडापावच्या गाडीची व रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींची मोडतोड करण्यात आली. चैतन्य दिलीप जाधव, प्रताप दत्तात्रेय जाधव व आणखी एक जखमी झाला.
या जखमींना लालटाकी भागातील स्वास्थ्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विरुद्ध जमाव तेथेही गेला, तेथेही रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेची व उभ्या पाच, सहा मोटरसायकलींची मोडतोड करण्यात आली. दगडफेकही करण्यात आली. तासाभराने तोफखाना पोलीस दंगल नियंत्रण पथकासह घटनास्थळी पोहचले. नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. राष्ट्रवादीचे जाधव समर्थक दोनजण आनंदॠषी रुग्णालयात दाखल असल्याचे समजले.
चैतन्य जाधव यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार सूरज सुभाष जाधव, त्याचे दोन भाऊ संदिप व सुशांत, रोहित मुत्याल, अक्षय आडेप, संदिप गुड्डा यांच्यासह इतर २० ते २५ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगा करणे, मारहाण करणे, शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर विरुद्ध बाजुने अर्जुन जज्जर याने दिलेल्या फिर्यादिनुसार अभिमन्यू राजू जाधव, धनंजय जाधव, आबा जाधव, राजु जाधव, राहुल मुथा, योगेश लिपाणे, सुमित पिलपेल्ली यांच्यासह १० ते १२ जणांविरुद्ध मारहाण करुन जखमी केल्याचा व शस्त्रप्रतिबंधक कायद्यान्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण सुरज जाधव याच्या वडापावच्या गाडीवर उभे असताना वरील लोक तेथे आले व त्यांनी तुम्ही बाहेरच्या लोकांचा वाढदिवस आपल्या गल्लीत का साजरा करता, असे म्हणून बंदुकीच्या बटाने, लाकडी दांडक्याने व चाकूने मारहाण केल्याचे म्हटले आहे.
सायंकाळपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेली नव्हती तसेच विरुद्ध बाजूची फिर्याद दाखल झालेली नव्हती. अधिक तपास पोलीस निरीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक काळे अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा हा गट व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत मारामारी झाली होती.