जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार प्रकरणाचे लोण आता रायगडपर्यंत येऊन पोहोचले आहे. शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी कन्हैया कुमारचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. त्यावर भाजप युवा मोर्चाने आक्षेप घेतला आहे. शेकापचा खरा चेहरा यामुळे समोर आल्याचा आरोप भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी केला आहे. चित्रलेखा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक या सोशल मीडियावर कन्हैयाकुमारचे समर्थन केले आहे. कन्हैयाने आझादीबाबत केलेले वक्तव्य आपल्याला भावल्याचे सांगत कन्हैयाला भेटण्याची इच्छा त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. मात्र कन्हैया कुमार हा देशद्रोही असून त्याचे समर्थन करणाऱ्या चित्रलेखा पाटील यांचा आम्ही निषेध करीत असल्याचे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत संगितले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटेनचा नेता कन्हैयाकुमार याने देशविरोधी वक्तव्ये केली आहेत. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने ज्या अफजल गुरूचे समर्थन केले आहे, त्याला न्यायालयाने दोषी ठरवले. त्यामुळे कन्हैयाचे समर्थन करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा आम्ही निषेध करणार आहोत. जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यात निषेध करण्याचे आदेश युवा मार्चाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले असल्याचे या वेळी मोहिते यांनी स्पष्ट केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश दबके, युवा मोर्चाचे अलिबाग तालुका अध्यक्ष मंगेश माळी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
दरम्यान आपल्या भूमिकेवर आजही आपण ठाम असल्याचे स्पष्टीकरण शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी दिले आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याने देशद्रोहाच्या आरोपप्रकरणी जातमुचलका सादर केल्यानंतर त्याची तिहार कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याने आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे. कन्हैयाकुमार याच्याविरुद्ध काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. शेकाप पक्ष स्वत:च्या सिद्धांतावर उभा असलेला पक्ष आहे. त्यामुळे माझे मत व्यक्त करताना मी सोशल मीडियावर काय विधान करावे याची मला कल्पना आहे, एक डाव्या विचारांची कार्यकर्ती म्हणून मी कन्हैयाकुमारचे समर्थन करत असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी म्हटले आहे.
त्यामुळे देशाच्या राजधानीत सुरू झालेले जेएनयूचे लोण आता रायगडाच्या राजधानीत येऊन पोहोचले आहे. निवडणुकीनंतर काहीशा सुस्तावलेल्या जिल्ह्य़ातील राजकीय पक्षांना यानिमित्ताने एक नवीन मुद्दा मिळाल्याचे पाहायला मिळते आहे.