ताडोबात पर्यटकांनी वाघाला घेरण्याच्या मुद्यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी वनखात्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फेसबुकवरील त्यांच्या नाराजीमुळे वनखात्यात अस्वस्थता असली तरी उपाययोजनांच्या मुद्यावर मात्र अजून या खात्याचे अधिकारी मौन बाळगून आहेत.
चंद्रपूरपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक सारे नियम पायदळी तुडवून वाघाला घेरत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकसत्ता’ने मंगळवारी प्रकाशित केले. या वृत्तावरून राज्यभरातील वन्यजीवप्रेमींच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली. अशा पद्धतीचे जीवघेणे व्याघ्रदर्शन योग्य नाही, असा सूर सर्वत्र उमटू लागला आहे. हे वृत्त वाचून अस्वस्थ झालेल्या जयंत पाटलांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला. हे वृत्त फेसबुकवर टाकत त्यांनी वनखात्याचे अधिकारी नेमके करतात तरी काय असा सवाल उपस्थित केला. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या असल्या तरी मंत्र्यांची ही नाराजी वनाधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडवून गेली आहे. स्वत: जयंत पाटील वन्यजीवप्रेमी आहेत. विदर्भात दौऱ्यावर आले की ताडोबासाठी ते हमखास वेळ काढतात. ताडोबात वास्तव्य असताना कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही यासाठी स्वत: पाटील दक्ष असतात. त्यांचे हे व्याघ्र प्रेम वनखात्याला सुद्धा ठाऊक आहे.
या पाश्र्वभूमीवर त्यांनी ‘लोकसत्ता’च्या वृत्ताचा आधार घेत वनखात्याच्या धोरणावर जाहीरपणे व्यक्त केलेली नाराजी आता चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ताडोबात दरवर्षी पर्यटकांकडून वाघाला घेरण्याचे प्रकार सर्रास घडतात. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने आजवर कधीच गंभीरपणे लक्ष दिले नाही. व्याघ्रदर्शनाच्या बाबतीत राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने पर्यटकांसाठी अनेक नियम तयार केले आहेत. त्याचे सर्रास उल्लंघन होते. लोकसत्ताच्या वृत्तात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रातून ते स्पष्टपणे दिसून सुद्धा येते. तरीही या मुद्यावर पर्यावरण प्रेमी संघटनांनी केलेल्या तक्रारीकडे व्यवस्थापनाचे अधिकारी गंभीरपणे लक्ष द्यायला तयार नाहीत. मंगळवारच्या वृत्ताची दखल घेत येथील ग्रीन प्लॅनेट संघटनेने ताडोबा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेण्यास अधिकारी इच्छूक नव्हते असे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज लोकसत्ताशी बोलताना सांगितले. वन्यजीवप्रेमी संस्थांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवणाऱ्या वनाधिकाऱ्यांना आता खुद्द सरकारमधील एका मंत्र्यानेच घरचा अहेर दिल्याने अधिकाऱ्यांचे वर्तुळ अस्वस्थ आहे.
 राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम व या मुद्यावर नाराजी व्यक्त करणारे जयंत पाटील एकाच जिल्हय़ातील आहेत. वाघांवरून सुरू झालेल्या राजकीय खडाखडीनंतर काय घडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.