देशात दररोज विविध ठिकाणी लाखो-कोटींचे घोटाळे उघडकीस येतात. एखादा लिपिक, अधिकारी हजारो, लाखो रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचे वृत्त ही अधूनमधून माध्यमांत येत असते. पण बुलडाणा जिल्ह्यातील घटना वेगळीच असून क्लासवन दर्जाचे अधिकारीही अशा प्रकारचे कृत्य कसं काय करतात, असा प्रश्न पडतो. बुलडाण्यातील एका शेतकऱ्याकडून बैलावर उपचार करण्यासाठी क्लासवन दर्जाच्या पशुधन विकास अधिकाऱ्याने चक्क १५० रूपयांची लाच घेतली. नडलेल्या शेतकऱ्याकडून १५० रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या डॉक्टरला रंगेहाथ पकडले. डॉ. रमेश बाजीराव पाचारणे (वय ५१, रा. जांभरून रोड, बुलडाणा) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना आज (दि.१० एप्रिल) दुपारच्या सुमारास घडली.

बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे राहणारा तक्रारदार शेतकरी आपल्या जखमी बैलावर उपचार करण्यासाठी जनावरांच्या शासकीय दवाखान्यात गेला. त्यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. रमेश पाचारणे यांनी तक्रारदाराला पैशांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय बैलावर उपचार करणार नसल्याचे सांगितले. तक्रारदाराने पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पाचारणे यांना पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सांगितल्याप्रमाणे तक्रारदाराने १५० रूपये डॉ. पाचारणे यांना दिले. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारणे यांना रंगेहाथ पकडले.

लाचेसाठी अधिकारी वर्ग किती खालच्या दर्जाला जातात तेच या प्रकरणावरून समोर आले आहे. पिकांना हमीभाव नाही तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असताना बैलाच्या उपचारासाठी या अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडून लाच घेतल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.