पक्षविरोधी भूमिका घेत शिवसेनेला मदत केल्याचा ठपका असलेल्या राज्यमंत्री फौजिया खान यांना पक्षाने ‘क्लिनचिट’ दिली आहे.  लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांनी म्हटले आहे.
ऐन निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कलहाचा कलगीतुरा चर्चिला जात होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातल्या सहा जणांना नोटिसा बजावल्या होत्या. यात श्रीमती खान यांच्यासह माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर, जि.प.चे उपाध्यक्ष समशेर वरपुडकर यांच्यासह जालना जिल्ह्यातील दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्या नोटिसीच्या उत्तराचा खुलासा श्रीमती खान यांनी पक्षाकडे पाठविला होता. तो प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थिती व सत्यावर आधारित खुलासा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी फौजिया खान यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.  लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपण अनेक ठिकाणी जाऊन, प्रामाणिकपणे पक्षाचे काम करून, जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली असल्याचे पत्रात नमूद केले आहे.  या अनुषंगाने श्रीमती खान यांना धन्यवाद देत वेळोवेळी पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल, असा विश्वासही पत्रात नमूद आहे.
पक्षातल्या एका गटाने तक्रार केल्यानंतर विशेषत: उमेदवार व पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीमती खान यांना नोटीस बजावण्यात आली होती. जर पक्षाला श्रीमती फौजिया खान यांनी निवडणुकीदरम्यान उत्तम कामगिरी बजावली असे वाटत असेल तर मग कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत अपरिपक्वपणा का दाखवण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र काँग्रेस-राष्ट्रवादीत बेदिली असताना केवळ परभणी जिल्ह्यातच अशा नोटिसा बजावण्यात आल्या. थेट पक्षाच्या राज्यमंत्र्यांनाच नोटीस बजावण्याची ‘किमया’ राष्ट्रवादीकडून केली.