स्वच्छ भारत अभियानाला आता गती मिळू लागली आहे. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील महिला बचत गटातील महिलाही या अभियानांमध्ये सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत. शौचालय असलेल्या घरीच लेकी देणार अशी शपथ महाड येथील महिला बचत गटांनी घेतली. हागणदारी मुक्त गाव मोहिमेला आता ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.

गावे, वस्ती वाडय़ा स्वच्छ रहावा या दृष्टीकोनातून १९९९ साली निर्मलअभियान राबविण्यात आला. कालांतराने त्यात बदल होऊन दोन ऑक्टोबर २०१४ पासून हागणदारी मुक्त गाव ही मोहिम राबविण्यात आली. रायगड जिल्ह्य़ात या मोहिमेला चांगल्या पद्धतीने

प्रतिसाद मिळू लागला. उघडय़ावर शौचास बंदी घालून गावा गावात वैयक्तिक शौचालये उभारण्याची संकल्पना अंमलात आणण्यात आली. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्य़ात ७२ टक्के म्हणजेच दोन लाख ६५ हजार ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहेत. शंभर टक्के जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी ग्रामीण भागात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद साधण्यात आला. तसेच काही सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी विविध संस्थांमार्फत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

स्वच्छ भारत अभियान ही चळवळ गतिमान होऊ लागली आहे. घर तेथे शौचालय आणि हागणदारी मुक्त गाव या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. महाड येथे पंचायत समितीच्या महिला बचत गटांची सभा नुकतीच पार पडली. या सभेत गटविकास अधिकारी मंडलिक यांनी दशसुत्रीमधील आरोग्य व स्वच्छतेच्या कामात पुढे येण्याविषयी आवाहन केले. ग्रामीण महिला व त्यांच्या आरोग्याविषयी किरण शिरगावकर यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना आरोग्य संपन्न जीवनासाठी शौचालय हाच स्त्रिचा खरा दागीना आहे, असे सांगितले. यावेळी महिला बचत गटाच्या प्रतिनिधींनी शौचालय बांधण्याचा निर्धार मनोगतातून व्यक्त करून बचत गट हागणदारी मुक्त करण्याबरोबरच गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी शौचालय असलेल्या घरी लेकी देण्याची शपथ यावेळी त्यांनी घेतली. यावेळी गटविकास अधिकारी ढाकणे, सहाय्यक गटविकास अधिकारी नाखले, दिलासा फाऊंडेशनच्या वनिता मोरे, गट समन्वयक, समुह गट समन्वयक तसेच महिला सदस्या मोठय़ा संख्येने उपस्थित होते.