कोकण किनाऱ्यावरील जलदुर्गापकी एक असलेल्या मुरुडजवळच्या अरबी समुद्रातील जंजिरा किल्ल्यावर डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे गेली कित्येक वष्रे झाडाझुडपात आणि प्लास्टिकच्या विळख्यात अडकलेल्या जंजिरा किल्ल्याने मोकळा श्वास घेतला आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या मुरुडजवळच्या समुद्रातील जंजिरा किल्ला ही पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित वास्तूमध्ये समाविष्ट आहे. परंतु या किल्ल्याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे किल्ल्याच्या परिसराला अवकळा आली होती. किल्ल्यावर फिरणेदेखील पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांना मुश्कील झाले होते. आध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जंजिरा किल्ला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुरुड तालुक्यातील ८०० हून अधिक श्री सदस्य या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी किल्ल्याचा सुमारे २२ एकरचा परिसर स्वच्छ केला.
येथील जुन्या वास्तूंवर उगवलेली झुडपे मुळासकट उपटून काढल्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. परंतु किल्ल्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडू लागला. जंजिरा किल्ला प्लास्टिकच्या विळख्यात सापडला. श्री सदस्यांनी इथं प्लास्टिकच्या हजारो बाटल्या गोळा केल्या. किल्ल्यावरील दाट झाडींमुळे अनेक भागात पर्यटक फिरकतही नव्हते. तो भाग आता मोकळा करण्यात आला असून तलावातील शेवाळही साफ करण्यात आले आहे. श्री सदस्यांनी हाती घेतलेल्या या मोहिमेचे पर्यटकांनी स्वागत केले आहे.
पुण्याहून आलेले संतोष महाडिक यांनी या मोहिमेचे कौतुक केले. त्याचवेळी सरकारवर टीका केली. सरकारला या वास्तूची डागडुजी करावीशी वाटत नाही. किमान साफसफाई तरी करायला हवी होती. ते कामदेखील सामाजिक संस्थांना करावे लागते आहे, याबद्दल नाराजी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 1:14 am