पंतप्रधान नरेंद्र मोदी साऱ्या देशाला स्वच्छतेचे धडे देत असताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज नागपूर नागपूर रेल्वेस्थानक कचरापथ करून टाकले. जेवणाची रिकामी पाकिटे, पाण्याच्या बाटल्या फलाटावर फेकत अजनी स्थानक अस्वच्छ करून टाकले.

मुंबई येथे महामेळाव्याला जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे हजारो कार्यकर्ते अजनी रेल्वेस्थानकावर आले होते. मात्र, पक्षाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कार्यकर्त्यांना पाच तासांपेक्षा जास्त वेळ गाडीची प्रतीक्षा करावी लागली. मात्र, या प्रतीक्षेच्या काळात स्वत:ला निष्ठावंत आणि स्वच्छतेचे पालन करणारे असा दावा करणारे कार्यकर्ते फलाटावर पाण्याचे पाऊच, खाद्यपदार्थ असलेली पाकिटे फेकत कचरा करीत होते. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर हा प्रकार सुरू होता. त्यांनी कोणीच हटकले सुद्धा नाही.

एकीकडे दिवस-रात्र रेल्वेच्या महिला कर्मचारी अजनी रेल्वेस्थानक स्वच्छ राहावे यासाठी मेहनत करीत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतेची ऐशीतैशी करीत फलाटावर मोठय़ा प्रमाणात कचरा केला. कचरा केला तर गाडी आल्यानंतर तो उचलण्याची तसदी  एकाही कार्यकर्त्यांनी घेतली नाही. पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांची जेवणाची आणि पाण्याची सोय करण्यासाठी पाण्याचे पाऊच आणून ठेवण्यात आले होते.

मात्र, ते रिकामे पाऊच फलाटावर फेकून दिले जात होते. कार्यकर्त्यांनी फलाटावर सामान ठेवताना एका बाजूला ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या आदेश न मानता कार्यकर्त्यांचे सामान फलाटावर अस्ताव्यस्त पडले होते.

रेल्वे गाडीमध्ये स्वच्छता ठेवा, असे फलक लावण्यात आले आणि सूचना दिल्या जात असताना कार्यकर्ते प्रत्येक  डब्यावर पक्षाचे बॅनर स्टिकर लावत होते. एकीकडे पंतप्रधानांच्या  स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासाठी नागरिकांना संदेश देत जनजागृती करायची आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या आदेशाची पायमल्ली करण्याचा प्रकार अजनी रेल्वेस्थानकावर बघायला मिळाला.