निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची घोषणा करूनही सत्तेत आल्यावर आश्वासनांचा विसर पडू न देता शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांनी केले आहे.
जिल्हा काँग्रेसची बैठक शुक्रवारी राष्ट्रवादी भवन येथे झाली. त्याप्रसंगी भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार हे होते. शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी प्रमाणात असून सरकारने फक्त आश्वासन न देता तातडीने शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवावी, असेही भुजबळ म्हणाले.
हक्काचे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. नार-पारचे पाणी हे महाराष्ट्राच्या हक्काचे असून ते बाहेर जाऊ देणार नाही. नार-पारच्या पाणी आंदोलनासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भुजबळ यांनी दिला.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे भाव घसरत असल्याने सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पगार यांनी पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला. सरकारने पेट्रोल, डिझेल व पेट्रोलजन्य वस्तूंचे भाव कमी करावेत, निवडणूक काळात टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन देऊन सत्तेत आल्यावर सोयीस्कररीत्या त्यांना विसर पडल्याचा निषेध, नाशिक जिल्ह्य़ातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पीक कर्जाचे व्याज माफ करून कर्जात सवलत द्यावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन फक्त घोषणाबाजी न करता शेतकऱ्यांपर्यंत तातडीने मदत पोहोचवावी, असे ठराव या बैठकीत मांडण्यात आले.