हवामानातील बदलाचा महाबळेश्वर पट्टय़ातील स्ट्रॉबेरीला फटका बसला असून, यंदा लागवड विलंबाने झाली आहे. तरीही नवीन मालाला १५० ते २५० रुपयांच्या दरम्यान किलोला भाव मिळत असल्याने शेतकरी सध्या तरी खूश आहेत.

लालभडक स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर, वाई, जावळी पट्टय़ातील प्रसिद्ध. महाबळेश्वर पाचगणी परिसराने स्ट्रॉबेरीला ओळख दिली. इंग्रजांनी नवनवीन पर्यटनस्थळे (गिरीस्थाने) उभारली होती. इंग्रजांनी या परिसराची पाहणी करताना हवामानाचा अंदाज घेतला. या परिसरात त्यावेळी स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरीसारखी इंग्लडमधील फळे इकडे आणली. स्ट्रॉबेरी पीक यशस्वी झाले आणि त्याला मिळणारा भाव पाहून मोठय़ा प्रमाणात शेतकरी या पिकाकडे आकर्षित झाले. सुरुवातीला महाबळेश्वर तालुक्यात अनेक वर्षे ऑस्ट्रेलियन व्हरायटीची लागण व्हायची. या स्ट्रॉबेरीचे फळ छोटे आणि एकरी केवळ दोन टन उत्पादन मिळत असे. या काळात शेतकऱ्यांचे कष्ट जास्त होते. १९९२ नंतर स्ट्रॉबेरीची अमेरिकी व्हरायटी उपलब्ध झाली. यामुळे लागवड वाढली. मागील तीन-चार वर्षांत इराण, इटाली, स्पेन आदी देशांतून नवीन स्ट्रॉबेरीच्या व्हरायटी आल्या. लागवडही यशस्वी होताना दिसताच महाबळेश्वरबरोबरच वाई, जावळी, सातारा, कोरेगाव, पाटण तालुक्यांत स्वीटचार्ली, िवटर, कामारोदा, नाभिला, कामीला, आर-१, आर-२, एसए, िवटर डॉन आदी नव्या जाती आल्या.  या जातींचे उत्पादन जास्त, मोठे फळ, खायला आणि चवीला चांगले आहे. वाई परिसरातील फळ दोन-तीन दिवस टिकते तर महाबळेश्वर तालुक्यातील फळ चार-पाच दिवस चांगले टिकते. महाबळेश्वर तालुक्यात पाऊस जास्त असल्याने स्ट्रॉबेरीच्या रोपांची मोठय़ा प्रमाणात लागण वाईला आणि पाऊस कमी झाला की महाबळेश्वरला लागवड करतात. महाबळेश्वर तालुक्यातही ग्रीन हाऊस नर्सरीत रोपे तयार होतात. रोपे कमी पडत असल्याने वाईला रोपांची मागणी मोठी वाढत आहे. सुरुवातीला पावसात रोपांना वास (फंगस) आणि किडीपासून संरक्षणासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. थंडीत मात्र कीड आणि वास लागत नाही आणि कीटकनाशकांचा वापर करावा लागत नाही. आता अनेक शेतकरी जीवामृत (खत) आणि दशपर्णी (आयुर्वेदिक) अर्क कीटकनाशक म्हणून वापरतात. स्टॉबेरी हे फळ थेट खाण्याचे असल्याने आता सेंद्रीय पद्धतीचा वापर वाढत आहे. महाबळेश्वर तालुक्यात अशा एका गटाने काम सुरू केले आहे. वाई तालुक्यातील हवामान महाबळेश्वर तालुक्याशी निगडित होत असल्याचा मोठा फायदा होतो.

यावर्षी महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी मिळायला आवकाश आहे. कारण हवामान बदलामुळे विलंब झाला आहे. तर वाईला रोपांसाठी दोन महिने आधीच धावपळ सुरू होत असल्याने फळ सुरू झाले आहे. वाईतल्या मालाला १५० ते २००, तर महाबळेश्वरी मालाला २०० ते २५० रुपये किलो भाव मिळायला लागला आहे. नुकसान टाळून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. महाबळेश्वर तालुक्यात मधमाशी पालन व्यवसाय म्हणून केला जात असल्याने व स्ट्रॉबेरी फुलावर, पिकावर मधमाशी बसत असल्याने कीटकनाशक वापर फारच मर्यादित आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी आहे. किमान वीस गुंठे ते तीन एकर शेती असणारा हा वर्ग आहे. उष्णता वाढल्यावर कीटक वाढतात. दरवर्षी नोव्हेंबरपासून एप्रिल-मे पर्यंत हे पीक घेतले जाते. एप्रिल-मे महिन्यात हवेतील बाष्प, शेताच्या मातीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले की मग उत्पन्न कमी व्हायला सुरुवात होते आणि खर्च वाढायला लागतो.

आजच्या घडीला महाबळेश्वर तालुक्यात अडीच हजार, तर वाई, सातारा, कोरेगाव तालुक्यात पंधराशे एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड झालेली आहे. रासबेरी मार्च- एप्रिल- मे महिने असे केवळ तीन महिने पीक असते, तर मलबेरी मात्र वर्षांत दोन वेळा आक्टोबर-नोव्हेंबर आणि एप्रिल-मे असे पीक येते. स्ट्रॉबेरी, रासबेरी आणि मलबेरीला मुबंई-पुण्याच्या बाजारपेठेतून मोठी मागणी आहे. याशिवाय गोवा, बेंगलोर, हैदराबाद, सुरत, अहमदाबाद, दिल्लीतूनही मागणी वाढत आहे. स्टॉबेरीवर प्रक्रिया उद्योगही या परिसरात सुरू झाले आहेत. त्याची मोठी बाजारपेठ आहे. दरवर्षी भिलार आणि महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी महोत्सव होतो. यावेळी पर्यटकांना थेट शेतात जाऊन स्ट्रॉबेरीची चव चाखता येते. महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईत पर्यटकांची खरेदी मोठय़ा प्रमाणात होते. यामुळे शेतकऱ्यांना थेट गिऱ्हाईकाशी संवाद साधता येतो. पर्यटकही स्ट्रॉबेरीच्या गोडीवर बेहद खूश आहेत. स्ट्रॉबेरीच्या या गोडीने या परिसरातील आíथक गणित चांगलेच भक्कम होताना दिसत आहे.

स्ट्रॉबेरी, मलबेरी, रासबेरीची देशांतर्गत बाजारपेठेबरोबर परदेशातूनही मागणी वाढत आहे. स्ट्रॉबेरीची वाढती मागणी आज महाबळेश्वर, वाई तालुक्याबरोबर सातारा जिल्हा पूर्ण करू शकत नाही. यासाठी स्ट्रॉबेरीची लागवड वाढण्याची गरज आहे. तर रासबेरी आणि मलबेरीकडे सकारात्मदृष्टय़ा प्रतिसादाची गरज आहे. स्टॉबेरीच्या वाढत्या लागवडीसाठी शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना सहकार्य, सेंद्रीय शेती, विषमुक्त उत्पादनासाठी मार्गदर्शन, प्राथमिक माहिती व उत्पादनासाठी आíथक सहकार्याची आणि सहाय्याची गरज आहे.

गणपत पार्टे, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, भिलार, ता. महाबळेश्वर