लोकसत्ता वार्ताहर
गडचिरोली : करोना विषाणूची साथ आता गडचिरोली जिल्ह्यातही वेगाने पसरते आहे. थुंकीमधून करोनाचा  विषाणू पसरत असल्याने एकाचे थुंकणे सर्वांसाठी घातक ठरते आहे. खर्रा,तंबाखू खाणारे स्वतःला कॅन्सर व इतरांना करोना देतात. हा धोका ओळखून भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने साथ रोग नियंत्रण कायद्याअंतर्गत खर्रा,तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक व विक्री करणे हा गंभीर गुन्हा जाहीर केला आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन, पोलीस व मुक्तिपथ जनहितासाठी कायद्याची अमलबजावणी करीत आहेत.

शेकडो गावांनी आपल्या गावातील खर्रा,तंबाखू विक्री बंद करून आपली गावं सुरक्षित केली आहेत. अनेक शहरांच्या व्यापारी संघटनांनी सामूहिक निर्णय घेऊन खर्रा,तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक व विक्री न करण्याचा संकल्प केला आहे. आम्ही डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग व सर्च संस्था सर्वांचे या अभूतपूर्व कृतीसाठी अभिनंदन करतो. आम्ही जिल्ह्यातील लोकांना, ग्रामपंचायतींना, मुक्तीपथ गाव संघटनांना पानठेला व किराणा दुकानदारांना, प्रशासनाला आवाहन करतो कि करोना व कॅन्सर पासून रक्षणासाठी खर्रा-तंबाखू सोडा व करोना प्रसार थांबवा.