– संदीप आचार्य

मुंबई व पुण्यासह राज्यातील अनेक रुग्णालयात डॉक्टर व परिचारिका करोना रुग्णांच्या संपर्कात आले अथवा त्यांना करोना झाल्यास यंत्रणेकडून रुग्णालयाला सील ठोकले जाते, ते योग्य नसल्याचे राज्याच्या मुख्य सचिवांचे प्रमुख आरोग्य सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले. तसेच करोनाच्या चाचण्या वेगाने होण्यासाठी केंद्राने मोठ्या प्रमाणात चाचणी किट दिले पाहिजेत, असेही डॉ साळुंखे यांनी सांगितले.

जेवढ्या वेगाने प्रशासकीय यंत्रणा या रुग्णालयांना टाळे लावते, तेवढ्याच वेगाने निर्जंतुकीकरण करून रुग्णालय सुरु करण्यासाठी मदत का करत नाही, असा सवाल डॉ साळुंखे यांनी ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या मुलाखतीत केला. ज्या रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी करोनाबाधित असतील तेथील संबंधित सर्वांना तात्काळ क्वारंटाईन करून उपचार केले जावेत तसेच रुग्णालयाचे संपूर्ण निर्जंतुकीकरणाचे काम तात्काळ हाती घेऊन लवकरात लवकर रुग्णालय पुन्हा सुरू केले पाहिजे, अशी स्पष्ट शिफारस मी शासनाला केली आहे. सध्या मोठ्या संख्येने ज्या रुग्णांमध्ये फारशी लक्षणे आढळत नाहीत त्यांना ‘होम क्वारंटाईन’ केले जाते. अशी मंडळी खरोखरच घरात राहातात का, तसेच घरातही अन्य लोकांच्या संपर्कात येत नाहीत याची काहीही हमी अथवा ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे होम क्वारंटाईन ऐवजी महापालिका व राज्य सरकारच्या क्वारंटाईन केंद्रातच अशा व्यक्तींची व्यवस्था केली पाहिजे, असेही आपण शासनाला सांगितल्याचे डॉ साळुंखे म्हणाले. डॉ सुभाष साळुंखे हे राज्याचे आरोग्य महासंचालक होते तसेच जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ व अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांवर काम केले आहे. त्यांचा आरोग्य क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने सात एप्रिल रोजी मुख्य सचिवांचे प्रमुख आरोग्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून करोनाच्या लढाईत आता नव्याने काहीही करायची गरज नसून केंद्र सरकारने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे कसोशीने पालन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात त्यातही मुंबई व पुण्यात लॉकडाऊन व होम क्वारंटाईन गंभीरपणे पाळले जात नाही. याची काटेकोरपणे अमलबजावणी झाली पाहिजे तसेच हॉटस्पॉटवर लक्ष केंद्रित करून तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या होणे गरजेचे आहे. करोनाच्या लढाईत मास्क व पीपीइ किटचा कोणताही तुटवडा नसल्याचे वरिष्ठ पातळीवर वारंवार सांगितले जाते तर रुग्णालय पातळीवरील मास्क व करोना किटचा तुटवडा असल्याच्या तक्रारी डॉक्टर व परिचारिकांकडून करण्यात येतात याकडे लक्ष वेधले असता तोही प्रश्न सुटण्यासाठी प्रशासनाने योग्य समन्वय ठेवण्याची शिफारस केल्याचे डॉ साळुंखे म्हणाले.

राज्य शासनाने करोनावरील उपचार व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या तीन वेगळ्या समित्यांची नियुक्ती केली आहे. यात आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तर केईएमचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे व डॉ संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली अन्य दोन समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तिन्ही समित्यांच्या निष्कर्ष व उपाययोजनांचे एकत्रिकरण करून उपाचारासीठीचा एकच समान प्रोटोकॉल केला जावा असेही आपण स्पष्ट केल्याचे डॉ साळुंखे म्हणाले.

सर्वात महत्वाचे म्हणजे करोनाच्या लढाईत डॉक्टर व परिचारिकांना पुरेशी विश्रांती मिळणे गरजेचे आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह काही रुग्णालयात डॉक्टर व परिचारिका अतिरिक्त काम करत आहेत. खरे म्हणजे ही लढाई मोठी आहे तसेच नवीन आहे. त्यामुळे डॉक्टर व परिचारिकांना पुरशीच नव्हे तर सक्तीची विश्रांती व सकस आहार मिळालाच पाहिजे असेही डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले.