खासदार संजय जाधव यांनी  राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिंतूर व मानवत येथील बाजार समित्यांवरील प्रशासक मंडळाला स्थगिती दिली आहे. यानिमित्ताने शिवसेनेने राष्ट्रवादीवर कुरघोडी केली असून पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचा कलगीतुरा जिल्ह्यात रंगला आहे. या स्थगितीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पुन्हा अस्वस्थता पसरली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्थगिती आदेशानंतर राष्ट्रवादीने आपली प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा खासदार संजय जाधव यांच्यावर टिपणी केली आहे.

महायुती सरकारच्या काळात जिंतूर बाजार समितीवर  भाजपचे प्रशासक मंडळ होते, त्या वेळी खासदार संजय जाधव यांना एखाद्या निष्ठावान शिवसैनिकाची आठवण का झाली नाही, असा प्रश्न राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे नाव पुढे करून खासदार जाधव यांना भाजपला मदत करायची आहे, असा आरोपही बाबाजानी यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परभणी जिल्हा परिषदेत ज्या प्रमाणे आघाडी धर्म पाळला त्याचप्रमाणे खासदारांनी आघाडी धर्म पाळून मित्रपक्षाला विरोध करणे बंद करावे, असे आवाहन आमदार बाबाजानी यांनी केले आहे. खासदारांनी मांडलेली एकतर्फी बाजू ऐकून आज मुख्यमंत्र्यांनी जिंतूर व मानवत बाजार समितीच्या प्रशासक मंडळाला स्थगिती दिली, असेही यावेळी आमदार बाबाजानी यांनी स्पष्ट केले. आम्ही आमच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंत पाटील व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहोत. यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात होईल असे आमदार बाबाजानी म्हणाले.