पाचशे आणि हजारच्या नोटा बदलणे सोयीस्कर व्हावे यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घेतला आहे. राज्यातील दुर्गम भागात तसेच शहरातील कानाकोप-यात नोटा बदलण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर केला जाईल आणि तशा उपाययोजना करण्याच्या सुचनाही बँकांना दिल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच सर्व विद्यापीठांना डीडी ऐवजी धनादेशद्वारे शुल्क स्वीकारण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागांचे सचिव आणि आरबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत नोटबंदी आणि नोटा बदलण्याची प्रक्रीया यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवरुन माहिती दिली.  २४ नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून ५० किलोपर्यंतचे शेतमाल नेण्याची परवानगी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यामुळे शेतक-यांना त्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल आणि त्यातून फायदादेखील मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय राज्यातील टोलनाक्यांवर १८ नोव्हेंबरपर्यंत टोलमाफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शिक्षण विभागाला सर्व विद्यापीठांना परीक्षा फी व अन्य शुल्क डीडीऐवजी धनादेशाने स्वीकारण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्याच्या तंत्रशिक्षण विभागालाही तंत्रनिकेतन विद्यालयांमध्ये धनादेशनेच शुक्ल स्वीकारण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले.

नोटबंदीमुळे पेट्रोल आणि डिझेल भरण्यात अडचणी येतात. त्यामुळे संपावर जाऊ असा इशारा स्कूल बसचालक संघटनांनी दिला होता. या बसचालकांसोबतही बैठक घेतली असून चर्चेअंती बसचालकांनी संप मागे घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.