17 October 2019

News Flash

VIDEO: सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकण्यात आल्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी

इस्लामपूर-सांगली रस्त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जात असताना हे आंदोलन करण्यात आलं

सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकत निदर्शन करण्यात आलं. स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हे निदर्शन कऱण्यात आलं. इस्लामपूर-सांगली रस्त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जात असताना स्वाभिमानी पक्षाच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर येत कडकनाथ कोंबड्या फेकल्या. स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

पश्चिम महाराष्ट्रात सध्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचा विषय चांगलाच गाजत आहे. याच प्रकरणी चौकशी कऱण्याची मागणी करण्यासाठी स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपुर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराचा अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) तपास केला जावा अशी मागणी केली होती. शेट्टी यांनी मुंबईमधील ईडी कार्यालयात जाऊन यासंदर्भातील ईडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात आहे. ही संधी साधत स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेचा ताफा सांगलीच्या मार्गावर असताना कडकनाथ कोंबड्या आणि अंडी ताफ्यावर फेकत निदर्शन केलं. यावेळी काही भाजपा कार्यकर्त्यांनी धाव घेत स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यातून दूर केलं.

काय आहे प्रकरण ?
कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून राज्यातील अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले असताना शहरातील ६६ जणांना पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. तसेच रयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपनीच्या संस्थापक, संचालक, लेखापाला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रीतम माने याला अटक करण्यात आली असून कंपनीचे अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यासह हनुमंत शंकर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नीलेश शिवाजी आंबेडे (वय ३५,रा. धनलक्ष्मी सोसायटी, दत्तवाडी) यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष महारयत अ‍ॅग्रो कंपनीकडून दाखविण्यात आले होते. तक्रारदाराकडून अडीच लाख रूपये स्वीकारण्यात आले होते. रक्कम स्वीकारल्याची पावती तक्रारदाराला देण्यात आली होती. करारानुसार अटी आणि शर्थीचे पालन कंपनीकडून करण्यात आले नाही. त्यामुळे अंबोडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीकडून अंबोडे यांच्यासह ६६ जणांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. अंबोडे तसेच अन्य तक्रारदारांकडून १ कोटी ७३ लाख १९ हजार रुपये घेण्यात आले होते. फसवणूक प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कंपनीतील लेखापाल प्रीतम मानेला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर तपास करत आहेत.

First Published on September 16, 2019 2:16 pm

Web Title: cm devendra fadanvis mahajanadesh yatra kadaknath chicken in sangli sgy 87