शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय नारायण राणेंच्या पक्षाचं विलिनीकरण करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे नारायण राणेंचं भवितव्य अद्यापही अधांतरित असल्याचं दिसत आहे. नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन होण्यासंबंधी विचारलं असता शिवसेनेशी चर्चा केल्याशिवाय निर्णय होणार नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी अद्यापही अंतिम निर्णय झाला नसल्याचं सांगितलं आहे. शिवेसना सहमत होईल का असं विचारलं असता त्यांनी त्यासाठी आम्ही प्रयत्न करु असं म्हटलं आहे.

याआधी १ सप्टेंबरला नारायण राणे आपला पक्ष भाजपात विलीन करत भाजपाप्रवेश करणार आहेत असं वृत्त होतं. काही दिवसांपुर्वी नारायण राणे यांनी आपण १० दिवसांत मोठा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. भाजपासोबत राहायचं की नाही याचा निर्णय पुढील १० दिवसांत घेणार असल्याचं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं होतं. नारायण राणेंसोबत त्यांचे चिरंजीव नितेश आणि निलेश राणेही भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

काँग्रेस सोडल्यापासून नारायण राणे अद्यापही भाजपा प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. भाजपाकडून नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. मात्र अद्याप अधिकृत प्रवेश देण्यात आलेला नाही. नारायण राणे यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. यावर बोलताना नारायण राणे यांनी वेटिंगलाही लिमिट असते असं म्हणत आगामी १० दिवसांत निर्णय घेऊ असं सूचक वक्तव्य केलं होतं.

“येणाऱ्या १० दिवसांत मी भाजपासंबंधी निर्णय घेणार आहे. १० दिवसांनतर मी भाजपात असेन की माझा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चालवायचा यासंबंधी निर्णय घेईन”, असं नारायण राणे यांनी सांगितलं होतं. पुढे त्यांनी म्हटलं होतं की, “भाजपाने मला काही कमिटमेंट दिल्या आहेत. त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. मुख्यमंत्री यासंबंधी चार पाच दिवसांत मला सांगतील. त्यानंतर मी निर्णय घेईन”. यावेळी त्यांनी प्रतिक्षेलाही मर्यादा असते सांगत आपली नाराजी व्यक्त केली होती.