अ.भा. संत साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

समाजातील वाईट प्रथांवर वार करण्याचे आणि प्रत्येक वाईट गोष्टीविरोधात उभे करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे. याच संत साहित्याने समतेचा संस्कार करून समाजाचे आत्मबळ जागे करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत ७व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात विशेष अतिथी म्हणून फडणवीस बोलत होते. संत हे कर्माने व ज्ञानाने मोठे झाले. त्यामुळे लोक त्यांच्यापुढे नतमस्तक होतात. ११ ते १७व्या शतकापर्यंत आपल्या संस्कृतीवर होणारे आक्रमण परतवून लावण्याचे काम वारकरी संतांनी केले. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही. लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम संतांनी केले. संतांनी विश्वाची, जनतेची चिंता केली. ते कधीच आत्मकेंद्रित नव्हते. हे विश्वची माझे घर, हा विचार वारकरी संप्रदायाने मांडला. वारकरी संप्रदाय हे जगातील अद्वितीय संघटन आहे, असे फडणवीस म्हणाले.

संमेलनाध्यक्ष डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी संत साहित्याचा मूल्य शिक्षणात समावेश करावा, अशी मागणी केली. यावेळी बडोले यांचे भाषण झाले. प्रास्ताविक विठ्ठल पाटील यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.

सत्यपाल महाराजांना संत चोखोबा पुरस्कार प्रदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान व सामाजिक न्याय विभाग यांच्यावतीने सुरू करण्यात आलेला संत चोखामेळा पुरस्कार सप्तखंजेरीवादक हभप सत्यपाल महाराज यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख ५१ हजार व सन्मान, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.