पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना बोलावणार नाही या भूमिकेवरून माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी दोनच दिवसांत फारकत घेतल्याचे समोर आले. एका लग्नसोहळ्यासाठी अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानातून मुंबईतून औरंगाबादला गेले आणि तेथून पुन्हा एकाच वाहनातून लग्नस्थळी जाणे त्यांनी पसंद केले. इतकंच नव्हे तर त्याच विमानाने पुन्हा दोघं एकत्र मुंबईला गेल्याने राजकीय चर्चांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. विशेष म्हणजे अत्यंत उद्विग्न होऊन पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांना बोलवणार नसल्याचे म्हटले होते. या विमानप्रवासात दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मात्र समजू शकलेले नाही.

प्रताप पाटील चिखलीकर यांची मुलगी व भाऊसाहेब पाटील चिकटगावंकर यांच्या मुलाचा मंगळवारी औरंगाबादेत विवाहसोहळा होता. या विवाह सोहळ्यासाठी फडणवीस यांच्या विशेष विमानातून पवार औरंगाबादेत आले. विमानातून पहिल्यांदा फडणवीस तर नंतर पवार उतरले. विमानतळावर उतरल्यानंतर दोघेही पुन्हा एकाच वाहनातून विवाहस्थळी गेले. त्यामुळे औरंगाबादेत राजकीय चर्चांना उधाण आले.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. एकीकडे सरकारवर राष्ट्रवादीकडून टीका केली जाते अन् दुसरीकडे त्यांच्याकडून सत्कार स्वीकारले जातात, हे कितपत योग्य आहे असा प्रश्न मला विचारला जातो. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही सत्काराच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.