मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा अर्ध्यावर सोडत मुंबई गाठली होती. कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचं पाणी ओसरलं असून परिस्थिती सर्वसामान्य होत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा निवडणूक प्रचाराकडे वळवला आहे. २१ ऑगस्टपासून नंदूरबारमधून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे अशी माहिती महाजनादेश यात्रेचे नियोजन प्रमुख सुरजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

मुंबई, ठाणे, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमधील भीषण पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ६ ऑगस्ट (मंगळवारी) महाजनादेश यात्रा अर्ध्यात सोडून मुंबईत परतले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ६ ऑगस्ट रोजी अकोल्यामधील सभेनंतर बुधवारी सकाळी बुलडाणा येथून महाजनादेश सुरू होणार होती. मात्र पूरसपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाजनादेश यात्रा स्थगित करत मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. बुधावारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये पूरपरिस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी विविध उपाययोजनांबाबत निर्णय घेतले. त्यानंतर त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांबरोबर कोल्हापूर, सांगलीची हवाई पहाणी केली. मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पूरग्रस्त भागांसाठी केंद्र सरकारने ६ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सध्या कोल्हापूर, सांगली येथील पाऊस थांबला असून विविध शासकीय यंत्रणा मदतकार्य करत आहेत. त्याशिवाय मुंबई, पुणे आणि देशभरातील अनेक ठिकाणांहून पूरग्रस्त भागासाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री आता लवकरच महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करणार आहेत. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील जतनेशी संवाद साधण्यासाठी महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, आज स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश पूरग्रस्तांबरोबर उभा असल्याचे सांगितले. “आज एकीकडे देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांची आम्हाला सर्वांना काळजी आहे,” असं पंतप्रधान भाषणादरम्यान म्हणाले. तर दोनच दिवसापूर्वी कोल्हापूर, सांगलीबरोबरच कर्नाटकमधील पूरग्रस्तपरिस्थितीची हवाई पहाणी केल्यानंतर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी पूरग्रस्त राज्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.