11 August 2020

News Flash

मुख्यमंत्री फडणवीस-शरद पवारांमध्ये ‘कर्जमाफी पे चर्चा’

चर्चेला महसूलमंत्र्यांची उपस्थिती

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलदेखील उपस्थित होते. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी कर्जमाफीसोबतच इतरही अनेक मुद्यांवर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली.

‘कर्जमाफीचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा मिळेल, यासाठी आम्ही अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहोत. याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहोत. यासोबतच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याही भेटी घेतल्या आहेत. त्याप्रमाणे आज शरद पवार यांची भेट घेतली,’ अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे-पाटीलदेखील उपस्थित होते.

‘शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. याचा लाभ ८३ टक्के शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. यासोबतच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी वेगळे पॅकेज तयार केले जाणार आहे. याबद्दल शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली असून त्यांनी काही सूचनादेखील केल्या आहेत,’ अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राज्याची आर्थिक परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे समाधान यांचा समन्वय साधताना मदत करण्यात येईल, असे शरद पवार यांनी म्हटल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘कर्जमाफीची संपूर्ण योजना शरद पवारांनी समजून घेतली. यासोबतच आम्ही तयार केलेल्या योजनेचे त्यांनी स्वागत केले,’ असेदेखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही राज्याने केली नसेल, तेवढी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2017 12:09 pm

Web Title: cm devendra fadnavis chandrakant patil meet sharad pawar to discuss farmer loan waiver issue
Next Stories
1 मुख्यमंत्री-गडकरींसाठी राणे ‘स्वागतोत्सुक’
2 पंढरपूरच्या सरकारी रुग्णालयात बेवारस मृतदेह पोत्यात
3 ‘एशियाटिक टेक्स्टाईल्स पार्क’मध्ये सभासदांची ६० लाखांची फसवणूक
Just Now!
X