22 November 2019

News Flash

प्रत्येक गरीब कुटुंबाला घर; महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरणार

सोलापुरात श्रमिक पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून २३८ सदनिका बांधून देण्यात येणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

मुख्यमंत्र्यांचा विश्वास

सोलापूर : गेल्या पाच वर्षांत राज्यात १५ ते २० लाख घरे बांधली जात असून हा उच्चांक आहे. येत्या २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सोलापुरात श्रमिक पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून २३८ सदनिका बांधून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. विजापूर रस्त्यावर संभाजी (कंबर) तलावानजीक शासनाच्या दोन एकर क्षेत्रात श्रमिक पत्रकारांसाठी सदनिका प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाप्रसंगी नगरविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह महापौर शोभा बनशेट्टी, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष यदू जोशी आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,की पत्रकारांच्या घरांच्या संदर्भात शासनाने गेल्या पाच वर्षांत अनेक निर्णय घेत असताना त्या कृतीत आणताना अडचणी येत होत्या. सोलापुरातील पत्रकारांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे राज्यात पहिल्यांदाच म्हाडाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी तब्बल २३८ सदनिका तयार होणार आहेत. मुंबई व नागपूरसह राज्यातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये पत्रकारांसाठी अशा पध्दतीने सदनिका उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. या गृह योजनेत सदनिकांच्या किमती ३० टक्क्य़ांपर्यंत कमी होतील, इतपत दिलासा मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी त्यांनी सोलापुरातील पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेचा मुक्तकंठाने गौरव केला. या वेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांचेही भाषण झाले. यंदू जोशी यांनी पत्रकारांच्या समस्या मांडल्या.

प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक, तर श्रमिक पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे सचिव एजाजहुसेन मुजावर यांनी स्वागत केले. पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत माने व म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. दत्ता थोरे यांनी सूत्रसंचालन केले.

First Published on July 12, 2019 3:23 am

Web Title: cm devendra fadnavis confidence about home to every poor family zws 70
Just Now!
X