जे आपल्या पक्षाची चार लोकं निवडून आणू शकत नाहीत, त्यांच्यावर सू़डबुद्धीने कारवाई करून काय मिळणार असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला हाणला. गुरूवारी राज ठाकरे यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तब्बल 9 तास कसून चौकशी करण्यात आली. त्यांना मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर त्यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता.

“गेल्या काही वर्षांमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष संपत गेला आहे. गेल्या लोकसभेतही काही नाही. विधानसभेतही मनसेचा एक आमदार निवडून आला. त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. गेल्यावेळी नाशिक महानगरपालिकेवर त्यांची सत्ता होती. यावेळी केवळ दोनच नगरसेवक निवडून आले. इतर कोणत्याही महानगरपालिका, नगरपालिकेत, जिल्हा परिषदांमध्ये त्यांचे कोणीही लोक निवडून आले नाही,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

“राज ठाकरे हे यावेळी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारक बनले होते. त्यांनी आपल्या अनेकदा आपल्या भाषणाचा स्तर ओलांडला, टोकाची भूमिकाही घेतली. यानंतरही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. किंबहुना जनतेनं त्यांना नाकारलं. अशांविरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात कोणता लाभ आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच कोणताही लाभ जरी असता तरी अशी कारवाई आम्ही केली नसती. राज यांच्याकडे योग्य कागदपत्र असतील तर ते ती ईडीकडे सोपवतील. जर त्यांच्याकडे कागदपत्रं नसतील तर ईडी त्यांच्याविरोधात कारवाई करेल,” असेही ते यावेळी म्हणाले.