निवडणुका तोंडावर आल्याने विरोधक आपल्या विरोधात आकांडतांडव करत आहेत मात्र जनता आपल्यासोबत आहे हे प्रत्येक निवडणुकीने दाखवून दिलं आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. जालना या ठिकाणी भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये ते बोलत होते. नाद घुमूदे, कमळ फुलू दे या या प्रचारगीताचं उद्घाटनही याचवेळी करण्यात आलं. लोकसभा निवडणूक ही भारताचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. निवडणूक हे जर युद्ध असेल तर संघटन हे आमचं हे अस्त्र आहे असं म्हणत विरोधकांवर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. तसेच तीन नगरपालिकांमध्ये आम्ही कसा विजय मिळवला हे देखील सांगितलं.

२१ वं शतक हे भारताचं शतक असेल हे स्वामी विवेकानंद म्हटले होते. पुढील पाच वर्षात मोदींच्या नेतृत्त्वाखाली आपण स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला भारत साकारू शकतो असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. २०१४ ला आपण इतिहास घडवला, त्याचे आपण साक्षीदार होतो. आता २०१९ च्या निवडणुकाही आपल्याला अशाच ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार व्हायचे आहे. ही निवडणूक २०१४ च्या परिवर्तानवर शिक्कामोर्तब करणारी निवडणूक ठरणार आहे.

आपल्या विरूद्ध अनेक पक्ष एकत्र येत आहेत, या पक्षांकडे नीती नाही, नियम नाही धोरण नाही. मोदी हटाव हे एकच धोरण या पक्षांकडे आहे. कारण मोदी निवडून आले तर आमचं अस्तित्त्व संपेल अशी भीती या सगळ्यांना वाटते आहे. या भीतीपोटीच विरोधक एकत्र आले आहेत. यांच्यापुढे देशाचा विकास हे ध्येय नाही. भारतात सामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन व्हावं अशी विरोधकांची मुळीच इच्छा नाही असंही मुख्यमंत्री म्हटले आहेत.

निवडणुकांच्याआधी तुम्ही नेता ठरवू शकत नाही. सत्ता आली तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी सगळेच एकत्र येतील मात्र हे विरोधकांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. हे सगळे त्यांच्या राज्याचे नेते आहेत. त्यांनी कितीही विरोध दर्शवला, मोदी हटाव ही मोहीम कितीही राबवली तरीही ती यशस्वी होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच हे महागठबंधन नाही तर महाठगबंधन अशीही टीका त्यांनी यावेळी केली.