विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून त्यांना सभेत नकलाकार आणावे लागतात आणि ती लोक नरेंद्र मोदीजींची स्टाइल मारत फिरतात. पण मी या नकलाकारांना इतकंच सांगतो की तुम्ही सूर्याकडे पाहून थुंकले की थुंकी आपल्याच चेहऱ्यावर पडते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे. छगन भुजबळ हे स्वातंत्र्यलढ्यासाठी नव्हे तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगात गेला. अजून तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, किती बोलावं आणि काय बोलावं याचा जरा विचार करा, असेही त्यांनी भुजबळांना सुनावले आहे.

नांदेड येथे शुक्रवारी भाजपाच्या बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बूथ प्रमुखांना संबोधित केले. देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून विरोधकांचा समाचार घेतला. पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत सारा देश शोक व्यक्त करत असताना विरोधकांनी, आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले खरे; परंतु विरोधक याबाबत राजकारण करत आहे. खरे देशभक्त असाल तर सैन्याच्या पाठीशी उभे राहा, असे त्यांनी सांगितले.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी ‘महाठगबंधन’ गठीत केले असून भारतात निवडणुकीसाठी ‘दोन गट’ पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत देश ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी देशसेवा करत आहेत तर दुसरीकडे सर्व विरोधकांनी एकत्र येत ‘महाठगबंधना’च्या नावाखाली आपल्या परिवाराचा व खुर्चीचा विचार करीत असल्याची टीका त्यांनी केला. भाजपाला नव्हे तर देशाला जिंकवून देण्यासाठी काम करा, असे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळांवर टीका करताना फडणवीस म्हणाले, तुम्ही स्वातंत्र्यलढ्यासाठी किंवा गरीबांसाठी तुरुंगात गेला नाही. भ्रष्टाचार केला आणि राज्याच्या तिजोरीतील पैसा स्वत:च्या तिजोरीत भरला म्हणून तुम्ही तुरुंगात गेला. तीन वर्ष तुम्ही तुरुंगात होता आणि अजूनही तुमची सुटका झालेली नाही. तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, हे विसरु नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.