बऱ्याच वादानंतर अखेर चंद्रकांत खैरे यांचे नाव निश्चित

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शंभर कोटी रुपयांच्या रस्ते कामाचा शुभारंभ ३ जानेवारी रोजी येथे होत असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवायचे, यावरून सत्ताधारी शिवसेना व भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याचे चित्र मागील दोनतीन दिवसांपासून दिसत होते. अखेर खासदार चंद्रकांत खैरे हे अध्यक्षस्थान भूषवणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तत्पूर्वी त्यावरून बराच वाद झाला असून त्यामागे भाजप नेत्यांचे उट्टे काढण्याची शिवसेनेला संधी साधण्याचे राजकारण असल्याचे सांगितले जात आहे.

औरंगाबादेत २३ डिसेंबर रोजी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर वाहतूक बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना देण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या दोनच दिवसांपूर्वी खासदार खैरे यांनी बागडे यांच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. तोच धागा धरून हरिभाऊ बागडे यांनी अध्यक्षीय समारोपात खासदार खैरे यांना आदित्य ठाकरेंसमोरच लक्ष्य केले. महापालिकेच्या कारभाराचेही वाभाडे काढीत पक्षाच्या प्रमुख नेत्यासमोरच शिवसेनेच्या नेत्यांचा समाचार घेण्याची संधी बागडे यांनी साधली होती. त्यावरून शिवसेना नेत्यांची चांगलीच गोची झाली. बागडेंचा घाव सेना नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्याचाच वचपा काढण्याची संधी शिवसेना नेत्यांनाही गुरुवारच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त चालून असल्याचे मानले जात आहे.

भाजप व सेनेच्या नेत्यांमध्ये प्रथम या नियोजित उद्घाटनस्थळावरून व नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून चांगलीच सुंदोपसुंदी सुरू झाली. सोमवारी उद्घाटनस्थळ निश्चित करण्यासाठी टीव्ही सेंटर भागात एकत्रित गेलेल्या भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तेथेच चांगली जुंपली होती. भाजपचे आमदार अतुल सावेंसह अन्य पदाधिकारी व शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले, त्यांचे काही सहकारी यांच्यामध्येच तेथेच धुसफूस सुरू होती. भाजप नेते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना देण्यात यावे, या मागणीवर ठाम होते तर सेनेचे पदाधिकारी खासदार खैरे यांचे नाव पुढे रेटत होते. त्यावरून युतीतील नेत्यांमध्ये बराच खल झाला. अखेर मंगळवारी कार्यक्रम पत्रिकेवर अध्यक्षस्थानी चंद्रकांत खैरे यांचे नाव छापण्याचे निश्चित झाल्याची माहिती असून महापालिका प्रशासनाने मात्र याविषयी कमालीची गुप्तता पाळली होती. पत्रिका अद्याप छापली नसल्याचे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र एका अधिकाऱ्याने पत्रिकेचा छापील लिफाफा दाखवून आतील मूळ पत्रिका दाखवण्यास असमर्थता दर्शवली.

भाजपकडून पोस्टरबाजी

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठीचे मोठे फलक भाजप नेत्यांनी शहराच्या विविध भागात लावले आहेत. महापालिकेत शिवसेना व भाजपची युती असली, तरी दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे फलक लावण्याचे टाळल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असल्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव निश्चित केले आहे.

 – नंदकुमार घोडेले, महापौर.

राजशिष्टाचाराप्रमाणे कोणाचे नाव असावे, हे महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारावे, असे आम्ही त्यांना कळवले आहे. पत्रिका तेच छापणार आहेत. खासदार खैरे यांचे नाव त्यांनी निश्चित केले असेल तर ठीक आहे. पण शेवटी उद्घाटक मुख्यमंत्री आहेत आणि तेच शेवटी बोलतील.

 – अतुल सावे, आमदार.