“राज्यातील जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. जनतेला हेच सरकार आपल्या अपेक्षा पूर्ण करेल याची खात्री आहे. जनतेची काही कामं पूर्ण झाली असतील किंवा काही झाली नसतील, तरी जनतेनं आम्हाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. आम्ही ही कामं पूर्ण करावी म्हणून जनता पाठिंबा देत आहे. येत्या निवडणुकीत आम्ही बहुमताने निवडून येऊ,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गुरूवारी भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. शुक्रवारी महाजनादेश यात्रा धुळ्यातून जळगावात रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या यात्रा सुरू आहे. त्याला किती प्रतिसाद मिळत आहे, याची कल्पना सर्वांना आहे. अशा प्रकारच्या यात्रा काढण्याची परंपरा ही भाजपाची आहे. राष्ट्रवादीच्या यात्रेची परिस्थिती काय आहे हे सांगण्याची गरज नसून काँग्रेसकडेही यात्रा आहे की नाही याची कल्पना नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला टोला हाणला. यादरम्यान त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून केलेली, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेतीविषयक निर्णय, जलयुक्त शिवार अशी अनेक कामं पूर्ण झाली आहेत. आज अनेक निकषांवर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर काही निकषांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांवर आहे. देशातील राज्यांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांमध्ये महाराष्ट्र आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

खान्देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीपोटी 4 हजार 600 कोटी, तर विमा आणि बोंडअळी अशा प्रकारांसाठी 10 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिकची मदत केली आहे. तसेच यावेळी त्यांनी अन्य कामांचाही लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी मेगाभरतीवरही भाष्य केलं. मेगाभरतीचे काम सध्या सुरू आहे. अनेक विभागातील भरती प्रक्रियेसाठी ऑर्डर काढल्या आहेत. मेगाभरती सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. मोटार उद्योगात आलेल्या मंदीवर उत्तर देताना त्यांनी यावर केंद्र शासनाचं त्याच्यावर लक्ष असून ते त्यावर काम करतील, असं त्यांनी नमूद केलं.