मोहन अटाळकर, अमरावती

‘पुन्हा आणुया आपले सरकार’ हा नारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात १ ऑगस्टपासून निघणाऱ्या ‘मोझरी ते नाशिक’ या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सामाजिक सुधारणेतील योगदानाचा संदर्भ दिला गेला असला, लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या पश्चिम विदर्भातील ‘विजययात्रेत’ एकमेव अडसर ठरलेल्या अमरावती जिल्ह्य़ातून या यात्रेचा शुभारंभ करण्यामागे अनेक राजकीय अर्थ देखील दडलेले आहेत.

गुरुकुंज मोझरी ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी मानली जाते. त्या मोझरीतून महाजनादेश यात्रेचा शुभारंभ होणार आहे. या यात्रेला विकास यात्रा असेही म्हटले गेले आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना जनसंपर्काचे एक माध्यम म्हणून या यात्रेचा हेतू लपून राहिलेला नाही.

भाजपचे पश्चिम विदर्भात १८, तर पूर्व विदर्भात २५ आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला बरेच मागे टाकून भाजपने आपले संख्याबळ वाढवले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला विदर्भात चांगले यश मिळेल, हा अंदाज अमरावती आणि चंद्रपूर या दोन ठिकाणी खोटा ठरला. या निकालामागे अनेक कारणे असली, तरी भाजपने मात्र पक्ष संघटनात्मक पातळीवर त्याचे चिंतन सुरू केले आहे.

अमरावती जिल्ह्य़ात भाजपचे चार आमदार आहेत. महापालिकेत निभ्रेळ सत्ता आहे. अनेक पंचायत समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. ग्रामीण भागातही पक्षाचे जाळे विणले गेले आहे. यावेळी संपूर्ण देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असताना अमरावतीत अपक्ष उमेदवार निवडून येतो, याचे आश्चर्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. अमरावतीची जागा शिवसेनेने गमावली असली, तरी भाजपलाही आपसूकच त्याचा धक्का बसला आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांना मंत्रिपदावरून दूर सारण्यामागे वेगळी कारणे असली, तरी या पराभवाचे निमित्त साधण्यात आले. भाजपला विदर्भात आपली ताकद वाढवायची आहे. जनाधार वाढवण्याची धडपड त्यातून सुरू आहे.

काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघातून या महाजनोदश यात्रेचा शुभारंभ होत आहे. सलग दोन वेळा त्या या ठिकाणाहून विजयी झाल्या आहेत. २००४ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतला होता, याची आठवण भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे आता भाजपने या मतदारसंघावरही लक्ष केंद्रित केले आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्दय़ांचे काय?

या सरकारच्या काळात नागपूर आणि पूर्व विदर्भाच्या तुलनेत अमरावती विभागाकडे कमी लक्ष देण्यात आल्याची ओरड आहे. औद्योगिकदृष्टय़ा मागासलेल्या या प्रदेशात सिंचनाचाही अनुशेष मोठय़ा प्रमाणावर आहे. विरोधी पक्षात असताना सिंचनाच्या अनुशेषाबद्दल बोलणारे नेते आता सत्तेत असल्यावर गप्प बसले, असे आरोप केले जातात. पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र अजूनही थांबलेले नाही. या आत्महत्या दुर्दैवी आहेत, त्या रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, या आश्वासनांखेरीज भरीव अजूनही काही झालेले नाही, ही शेतकऱ्यांची भावना आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोझरीतून काय संदेश देतात. निवडणुकीला सामोरे जाताना कोणती आश्वासने देतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष राहणार आहे.

महाजनादेश यात्रेच्या शुभारंभाची जय्यत तयारी भाजपकडून सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोझरी येथील श्रीगुरुदेव विद्यामंदिराच्या मैदानात सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी ‘वॉटरप्रूफ’ मंडप उभारण्यात आला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. सामान्य नागरिकांसाठी देखील ठिकठिकाणी प्रवेशद्वारे आहेत, व्यासपीठ उंच ठेवण्यात आले असून हा कार्यक्रम पक्षाचा असला, तरी नेहमीप्रमाणे शासकीय यंत्रणा आणि सेवांचा पूरेपूर लाभ घेण्याची परंपरा पाळली गेल्याची चर्चा सुरू आहे. मोझरीतील सभा झाल्यावर तिवसा, तळेगाव, आर्वी, पूलगाव, वर्धा व त्यानंतर नागपूरमध्ये ही यात्रा जाईल.

सरकारी योजनांचे लाभार्थी वेठीस

सभेला गर्दी जमविण्यासाठी भाजपच्या आमदारांसह कार्यकर्त्यांनाही कामाला लावण्यात आले आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळालेल्या लोकांना गाठून त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्याचा आटापिटा सुरू आहे. महिला बचत गटांनाही कामाला लावण्यात आल्याची चर्चा आहे. गेला आठवडाभर भाजपचे पदाधिकारी ठिकठिकाणी मेळावे घेताना दिसले. यात्रेच्या शुभारंभप्रसंगी एक लाखावर जनसमुदाय येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्य़ात संततधार पाऊस सुरू असल्याने गर्दी जमवण्याचे आव्हान आयोजकांसमोर आहेच.