मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा १३ सप्टेंबर ते गुरूवार १९ सप्टेंबर या कालावधीत होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून तिसरा टप्पा प्रारंभ होऊन नाशिकला १९ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व महाजनादेश यात्राप्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली.

महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून प्रारंभ होईल. तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा १३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १,५२८ कि. मी. प्रवास करणार आहे. गुरूवार १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे महासभेने महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व महाजनादेश यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

यापूर्वी, दुसऱ्या टप्प्यातील यात्रेचा समारोप सोलापूर येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला होता. या दोन टप्प्यात महाजनादेश यात्रेचा राज्यातील 24 जिल्ह्यातील 106 विधानसभा मतदारसंघातून 2208 कि. मी. प्रवास झाला.