कॅबिनेट मंत्र्यांअभावी पुरवणी मागण्यांच्या चर्चेला नकार देऊन दोनदा सभागृह बंद पाडणारे विरोधक सत्तेत असताना दुटप्पी वागले. विरोधकांच्या या भेदभाव नीतीवर कडाडून टीका करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही भेदभाव केला होता, हे विरोधकांना ठासून सांगितले.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेसाठी मुख्यमंत्री उपस्थित होतात न होता तोच चर्चेला तोंड फुटले. विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराचे काम पुरवणी मागण्यात न घेतल्याने काहींच्या कामांना वारेमाप निधी, तर काहींना एक छदाम देखील नसल्याची खंत येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
त्यांचीच री ओढत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकार पक्षपात करीत असून पुरवणी मागण्यांमध्ये विरोधी बाकावरील आमदारांच्या कामांना निधी दिला नाही. अशा प्रकारची परिस्थिती आमच्या सरकारच्या काळात उद्भवली होती. त्यावेळी अध्यक्षांच्या दालनात गटनेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली. त्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कामांना डावलून पुरवणी मागण्यांमध्ये समावेश न करण्याची विरोधकांचे म्हणणे किती पोकळ आहे, हे दाखवून देणारी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.