राज ठाकरे यांचा आरोप

जालना : मराठा आरक्षणाच्या नावावर मुख्यमंत्र्यांचे निव्वळ राजकारण सुरू आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी येथे पत्रकार बैठकीत केली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न न्याय प्रविष्ट असून या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने घोषित केलेल्या ८० हजार नोक ऱ्यांमध्ये मराठा समाजास १६ टक्के आरक्षणाची घोषणा विधिमंडळात कशी केली? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण आरक्षणाच्या प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत का, असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले, एखाद्या विषयावर राजकीय उद्दिष्टासाठी भडकविल्याने हेडलाइन्स मिळतील. परंतु मूळ प्रश्न सुटणार नाही. आरक्षणाच्या विषयावर माझी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री कुणाचे तरी तोंड बंद करण्यासाठी बोलत असतात. देश आणि राज्याचे चित्र पाहिले तर बहुतेक शिक्षण संस्था खासगी आहेत. सरकारी नोक ऱ्यांमध्ये प्रमाण दोन-तीन टक्के आहे. खासगी नोक ऱ्यांत आरक्षण नसेल तर भांडण कशासाठी?

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी एकादशीस पूजा होऊ देणार नसल्याच्या इशाऱ्यावर राज ठाकरे म्हणाले, या प्रश्नांत विठ्ठलाचा काही दोष नाही. आषाढी एकादशीस गालबोट लागणार नाही, एवढे सर्वानी पाहिले पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात, की राज्यात १ लाख २० हजार विहिरी बांधल्या. त्या कुठे आहेत? जालनासारख्या शहरातही पंधरा दिवसांनी पाणी येते. इस्रोच्या अहवालाप्रमाणे महाराष्ट्राची वाटचाल वाळवंटाकडे होत आहे. राजस्थाननंतर वाळवंटाच्या संदर्भात महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. कुठे महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला? पाणी नाही, वीज नाही. अधिवेशने, पाटर्य़ा मात्र होत आहेत. मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत.

शिवसेना वैचारिक गोंधळात

राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधानांना मिठी मारली यात आपल्याला चुकीचे वाटत नाही. मोदींनी अनेकांना एवढय़ा मिठय़ा मारल्या, त्यात आणखी ही एक मिठी. शिवसेना पूर्ण वैचारिक गोंधळात आहे. राज्यात जे चालू तेच केंद्रात चालू आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर एकदम बदलले आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले.