मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी फेटाळली

नागपूर : राज्यातील एकूण दूध उत्पादनापैकी फक्त ४० टक्केच दूध सहकारी  संघामार्फत, तर ६० टक्के दूध हे खाजगी संघामार्फत संकलित होते. खाजगी दूध संघाकडे शेतकऱ्यांची कसलीच आकडेवारी नाही. त्यामुळे जर दुधासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले तर त्यातून नवे घोटाळे होतील. त्यामुळे दुधासाठी अनुदान देणे शक्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी फेटाळून लावली. खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन चुकीचे आहे. राज्य सरकारची चर्चेची द्वारे नेहमीच खुली असून शेट्टींसोबत चर्चेची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांशी  बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध भुकटी निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपयांचे अनुदान दिले आहे. त्याचप्रमाणे दूध संघानीही दुधाचे दर लिटरमागे ३ रुपयांनी वाढविले आहेत. मात्र लिटरमागे अनुदान देण्यात अडचणी आहेत. सरकारकडे खाजगी दूध संघाकडून राज्यभर संकलित होणाऱ्या दुधाची निश्चित आकडेवारी नाही. कर्नाटकमध्ये एकच दूधसंघ असल्यामुळे तेथे लिटरमागे अनुदान देणे शक्य आहे. मात्र, राज्यात तशी परिस्थिती नसल्याने असे अनुदान देता येणार नाही. गुजरातमधेही दूध भुकटीलाच अनुदान देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या आंदोलनावरून विरोधकही राजकारण करीत आहेत. सरकारच्या योजनांमध्ये स्वार्थी राजकारण आणून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा बँका आणि सहकारी संस्था या कशाप्रकारे भ्रष्टाचार करतात हे सहकारमंत्र्यांनी मागील आठवडय़ातच विधानसभेत समोर आणले आहे. यातील काही बँकांवर कारवाई करण्यात आली असून राज्य सहकारी बँकेची चौकशी निर्धारित वेळेत पूर्ण केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

आंदोलनाचे स्वरूप..

* पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्य़ात दूध संकलन ठप्प झाले होते. कोल्हापूर जिल्ह्य़ातून मुंबईला होणारा २० लाख लिटर दूधपुरवठा खंडित झाला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद, नांदेड, बीड जिल्ह्य़ात दूधफेक आंदोलन केले.

* नगरमध्ये सुमारे २४ लाख लिटर दूध रोखण्यात आले. तरी पोलिसांनी ६० टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवाना केले. जिल्ह्य़ात सहा ठिकाणी रस्त्यावर दूध ओतून देण्यात आले.

* नाशिकमध्ये कसारा घाटात टँकर रोखण्याचा प्रयत्न झाला. तरी दुपारी १२ वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्तात १५ टँकर मुंबईकडे रवाना करण्यात आले. प्रशासनाने दूध संकलन करणारी केंद्रे, उत्पादक संघ आणि टँकर यांना पोलीस बंदोबस्त देण्याची सज्जता ठेवली आहे.

* बुलढाणा जिल्हय़ातही अनेक ठिकाणी दुधाच्या गाडय़ा अडवून वाहनाची तोडफोड झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले. देवाला दुग्धाभिषेक करून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

मुंबईत ८० टक्के दूधपुरवठा

आंदोलनाचा परिणाम सोमवारी तरी मुंबईत जाणवला नाही. मुंबई, ठाण्यासह, नवी मुंबईत सोमवारी ८० टक्के दुधाचा पुरवठा झाल्याचा दावा मालवाहतूक संघटनांनी केला आहे. मात्र मंगळवारी दुधाचा कितपत पुरवठा होईल, याबाबत खात्री नाही.

दूध बंद आंदोलनाचा शहरी लोकांना थोडा त्रास होईल, याबद्दल माफी मागतो, मात्र दूध उत्पादकांना किती कष्ट पडतात हे पाहण्यासाठी खेडय़ाकडे या म्हणजे शहरी लोकांना मागणी रास्त असल्याची खात्री पटेल

खा. राजू शेट्टी,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते